विदर्भ पॅथॉलॉजी असोसिएशन आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्तनाच्या कर्करोगाची अत्याधुनिक चाचणी पद्धत’ या विषयावर उद्या, ८ ऑगस्टला कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत स्तनाचा कर्करोग तपासणीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती व त्याचे फायदे यावर माहिती दिली जाणार आहे.  मेडिकलमधील पॅथॉलॉजी विभागात सकाळी ९ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यशाळेत बेंगळुरू येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. शमीम शरीफ, मुंबई येथील टाटा मेमोरियल रुग्णालयातील डॉ. तनुजा शेट हे तज्ज्ञ या विषयावर सविस्तर माहिती देणार आहेत. पूर्वी स्तनात गाठ आल्यानंतर गाठीतील काही भाग शस्त्रक्रिया करून काढले जात असे. त्याचे परीक्षण करुन कर्करोगाचे निदान केले जात असे. तसेच त्याचा अहवाल येण्यासही बराच वेळ लागत असते. ही पद्धत अत्यंत खर्चिक व त्रासदायक असल्याने प्रत्येक गाठीची तपासणी होत नव्हती. सध्या नवीन पद्धत अस्तित्वात आली असून त्यात स्तनाच्या गाठीतील काही भाग शस्त्रक्रियेद्वारे काढण्याची गरज नाही. या पद्धतीत इंन्जेक्शनद्वारेच गाठीतील पाणी काढले जाते व त्याचे परीक्षण करून कर्करोगाचे निदान केले जाते. गाठीतील पाण्याचा अहवाल एकाच दिवशी मिळत असल्याने लवकरच उपचार करणे शक्य होत असल्याची माहिती विदर्भ पॅथॉलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. कैलाश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.  स्तनाचा कर्करोग सध्या क्रमांक एकवर येऊ पाहात आहे. एक लाख महिलांमध्ये २६ ते ३० महिलांना स्तनाचा कर्करोग आढळून येत आहे. यामध्ये १७ ते २० वर्षीय तरुणी सुद्धा आढळून येत आहे. त्याचे प्रमाण ३ ते ५ टक्के आहे. त्यामुळे नवीन पद्धतीचा वापर जास्तीत जास्त व्हावा तसेच त्याचा प्रसार प्रचार व्हावा, या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी डॉ. मेहरबानू कमाल, डॉ. डी.टी. कुंभलकर आणि डॉ. पौर्णिमा कोडाते उपस्थित होते.