बालकांच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने या विरोधातील कायद्याविषयी पोलीस यंत्रणेला न्यायालयीन कामकाजासंदर्भात येणाऱ्या अडचणींविषयी येथील समाजकार्य महाविद्यालय आणि नवजीवन फाऊंडेशन संचलीत ‘चाईल्डलाईन’ यांच्या वतीने पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
‘लैंगिक शोषणापासून बालकांचे संरक्षण अधियिनम २०१२’ या विषयावरील कार्यशाळेत शहरातील प्रत्येक ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि चाईल्डलाईनचे सदस्य उपस्थित होते. अ‍ॅड. श्यामला दीक्षित यांनी बाल लैंगिक शोषमाच्या तक्रारींमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून या सर्वाना जबाबदार समाजातील विकृत प्रवृत्ती असल्याचे सांगितले.
या कायद्यातील तरतुदी आणि शिक्षेचे स्वरुप याबद्दल त्यांनी माहिती दिली. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणेसोबत कुटुंबातील सदस्यांनीही सहकार्य करण्याची आवश्यकता त्यांनी मांडली.
समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख यांनी २०१२ पासून हा कायदा अस्तित्वात असून या कायद्याबाबत अजूनही समाज अनभिज्ञ असल्याचे निदर्शनास आणले. त्यामुळे या कायद्याबाबत पोलीस यंत्रणेसोबतच समाजामध्येही जनजागृती होणे महत्वाचे आहे असे मत यांनी मांडले. चाईल्डलाईनच्या शहर समन्वयक प्रणिता तपकिरे यांनी प्रास्तविक केले.
चाईल्डलाईनचे केंद्र समन्वयक प्रविण आहेर यांनी चाईल्डलाईनची कार्यप्रणाली मांडली. सत्यवती गुंजाळ, सुषमा जेजूरकर यांनी संयोजन केले.
धामणकर महाविद्यालयाचा वार्षिक सोहळा
पुणे विद्यार्थी गृहाच्या नाशिक येथील श्रीराम धामणकर महाविद्यालयाचा वार्षिक सोहळा संत व लोकसाहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. तुषार चांदवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. मूल्यांची घसरण होत असताना विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाबरोबरच आपल्या परिसरातील सामाजिक प्रश्नांबद्दल संवेदनशील राहणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी मांडले. अध्यक्षस्थानी विद्यार्थी गृहाचे संचालक एस. एम. जिर्गे होते. प्रा. स्वाती पोतदार, प्राचार्य डॉ. एन. एच. रौंदळ यांनीही मनोगत व्यक्त केले. यासपीठावर गंगुताई धामणकर, संचालक सुनील रेडेकर, संजय गुंजाळ, अमोल जोशी आदी उपस्थित होते. विविध प्रश्नांची दाहकता मांडत प्रा. डॉ. चांदवडकर यांनी सभागृहाला गंभीर केले.
‘दासू वैद्य’ यांचे ‘हे अभागी दिवस’ आणि संजय चौधरी यांची ‘गंगेवरील म्हातारी’ ही कविता त्यांनी सादर केली. सुभाष जिर्गे यांनी साहित्याने जशी सामाजिक प्रश्नांची दखल घेतली तशी दखल आपणही घ्यावी, असा सल्ला दिला.
प्राची बिडकरने पसायदान म्हटले. सूत्रसंचालन प्रा. नीता बोडके आणि प्रा. स्वाती पोतदार यांनी केले.
जनगणना प्रगणकांना लवकरच उर्वरित मानधन
मनसे शिक्षक सेनेचे प्रकाश सोनवणे, पुरूषोत्तम रकिबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा ग्रामीण विकास विभागाचे सहाय्यक प्रकल्प संचालक पी. एस. माळी आणि विस्तार अधिकारी एस. डी. डमरे यांची भेट घेऊन २०१२ मध्ये जनगणना प्रगणक म्हणून काम केलेल्या शिक्षकांचे मानधन त्वरित देण्याची मागणी केली. संबंधित अधिकाऱ्यांनी राहिलेल्या मानधनाच्या २५ टक्के रक्कम त्वरित देण्याचे मान्य करून ३८ लाख ४३ हजार रुपयांचा धनादेश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करत सदर रक्कम आठ दिवसात शिक्षकांना वितरित करण्याचे निर्देश दिले. यावेळी वासुदेव बधान, एकनाथ पाटील, बी. के. देसाई हेही उपस्थित होते.