पाव इंचापासून ते तीन इंचापर्यंतच्या तब्बल २२ हजार ५०० गणेश मूर्ती.. त्याच आकारात ढोल व बासरी वादन, पोथी अन् पुस्तकाचे वाचन करणाऱ्या गणेशाच्या कौशल्यपूर्वक निर्मिलेल्या नानाविध छटा.. इतकेच नव्हे तर, ५१ वेगवेगळे मुकूट परिधान करणारे तसेच १० थर रचून दहीहंडी फोडण्यास सज्ज झालेले श्रीगणेश.. गणेशाभोवती फेर धरून वाद्यवादन करणारे मूषक..अतिशय चिमुकल्या अशा हजारो मूर्ती घडवितानाच सजावटीत कापसापासून निर्मिलेले अक्षरधाम मंदिर.. एक लाख गुलकाडय़ांचे मंदिर.. साबुदाण्यापासून ताजमहाल..  अशा अभिनव पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणारे हे अवलिया म्हणजे सिन्नरचे संजय क्षत्रिय. इमारतींना रंगकाम करण्याच्या कामातून वेळ मिळेल, तेव्हा ते नाविण्यपूर्ण गणेश मूर्ती निर्मितीत गर्क होतात. सर्वजण दहा दिवस गणेशोत्सव साजरा करीत असले तरी क्षत्रिय व त्यांचे कुटुंबिय वर्षभर खऱ्या अर्थाने तो साजरा करतात.
गणेश मूर्ती बनविणारे कारागीर काही कमी नाहीत. पण, केवळ छंद म्हणून तो मनपूर्वक जोपासणारे तसे काही अपवाद. त्यात क्षत्रिय यांचा समावेश करावा लागेल. बहुतांश मूर्तीकार आकाराने मोठय़ा मूर्ती बनविण्यास प्राधान्य देतात. अतिशय लहान वा सूक्ष्म म्हणता येतील अशा मूर्तीची निर्मिती फारसे कोणी करत नाही. ही बाब लक्षात घेऊन क्षत्रिय यांनी १४ वर्षांपूर्वी अतिशय लहान आकाराच्या मूर्ती निर्मितीचा श्रीगणेशा केला होता. दरवर्षी एक ते दोन हजार या गतिने सुरू झालेले हे काम आज तब्बल साडे बावीस हजार मूर्तीपर्यंत येऊन पोहोचले आहे. विशेष म्हणजे, गणेशाच्या हजारो छटा साकारताना प्रत्येकाची भावमुद्रा वेगवेगळी ठेवल्याने कोणतीही मूर्ती समान दिसत नाही. रंगकामात भिंती समपातळीत करण्यासाठी वापरली जाणारी पांढरी भुकटी आणि डिंक यांचे मिश्रण मूर्तीसाठी वापर करण्यात आले. यामुळे मूर्तीला मजबुतपणा येतो, असे क्षत्रिय यांचे म्हणणे आहे. ५१ प्रकारचे मुकूट असणारे गणपती, पेटी, ढोल विणा आदी विविध प्रकारची वाद्ये वाजविणारा गणेश, दहा थर लावून दहीहंडी फोडणारे ८१ गणपती, गणेशाभोवती फेर धरून नाचणारे ११ मूषक या प्रकारांमध्ये क्षत्रिय यांनी यंदा भर घातली ती, हिरेजडीत गणेशांची. हिऱ्यांच्या आभुषणांनी सजलेल्या ५१ गणेश मूर्ती त्यांनी निर्मिल्या आहेत.
लहान आकाराच्या गणेश मूर्ती निर्मितीत क्षत्रिय यांना पत्नी वंदना, मुलगी पूजा व अक्षदा तसेच आई-वडिलांचे सक्रिय सहकार्य लाभते. इयत्ता दहावीत शिक्षण घेणारी त्यांची मुलगी पूजा तर मूर्तीवर डोळे तयार करण्याचे काम करते. गणेश मूर्तीत डोळे बनविण्याचे काम तसे सर्वात अवघड. कारण, त्यावर मूर्तीची संपूर्ण भिस्त अवलंबून असते. परंतु, वडिलांचे काम पाहून ती देखील त्यात पारंगत झाली आहे.
मूर्ती निर्मितीसोबत दरवर्षी नेत्रदीपक सजावट करण्याचे क्षत्रिय कुटुंबियांनी ठरविले आहे. यंदा कापसापासून त्यांनी अक्षरधाम मंदिर साकारले आहे. त्यासाठी ११ किलो कापूस, पाच किलो फेव्हिकोल, ६०० फूट लाकडी पट्टी, १० मीटर कापड व काही प्रमाणात जुन्या थमॉकोलचा वापर करण्यात आला. यापूर्वी त्यांनी एक लाख गुलकाडय़ांचा वापर करून तसेच ११०० इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्यांपासून मंदिरांची निर्मिती केली होती. साबुदाण्याचा कल्पकतेने वापर करून ताजमहाल निर्मितीची संकल्पनाही त्यांनी अशीच प्रत्यक्षात आणली. क्षत्रिय कुटुंबाची गणेश भक्ती इथपर्यंतच सिमीत राहिलेली नाही. ‘कॅसेटच्या कव्हर’वर १,१११ मूर्ती कोरून, त्याच्या सभोवताली लामण दिवे आणि गणपती आरती त्यांनी रेखाटली. या कव्हरचा आकार तीन बाय चार इंच इतका असतो. त्यावर २५१ विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती रेखाटून त्याच्या खाली संपूर्ण हरिपाठही मांडला. क्षत्रिय यांनी निर्मिलेल्या अशा नानाविध गणेशाची रूपे व नेत्रदीपक सजावट बुधवारपासून सिन्नर येथील नरसिंह मंदिरात पहावयास मिळणार आहे. अनंत चतुदर्शीपर्यंत हे प्रदर्शन सर्वासाठी खुले राहणार आहे.