ठाण्यातील एका मॉलमध्ये २१ बाय २७ फूट उंचीची पिशवी ८ तास ४४ मनिटांमध्ये रंगवून विश्वविक्रम करण्याचा पराक्रम येथील मनीषा ओगले यांनी केला आहे. आता या विक्रमाची नोंद गिनिज बुकमध्ये होणार आहे. ओगले यांनी पिशवीवर रंगकाम करताना चित्रांच्या माध्यमातून ‘पाणी वाचवा’ तसेच ‘पाणी हेच जीवन’ यांसारखे संदेश दिल्याने या विश्वविक्रमाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. ओगले यांनी याआधीही ४० बाय २० फूट लांबीचा कुर्ता तयार केला असून त्याची नोंद लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
सकाळी १० वाजल्यापासून ओगले यांनी पिशवीवर रंगकाम करण्यास सुरुवात केली. या पिशवीच्या अग्रभागी त्यांनी प्लॅस्टिकच्या विळख्यातून जगाला कशा प्रकारे मुक्त केले जाऊ शकते हे दाखविले आहे. या पिशवीवर त्यांनी पर्यावरण संवर्धनाविषयी विविध संदेश दिले आहेत. यात कागद वाचवा, झाडे लावा, पाण्याचा ऱ्हास टाळा यांसारख्या विविध संदेशांचा समावेश आहे. ओगले रंगकाम करत असताना पिशवी शिवण्याचे काम त्यांचे सहाय्यक करत होते. गिनिज बुकच्या वतीने के. नूतन आणि अनिल परेरा यांनी विक्रमाचे परीक्षण केले. आता या विक्रमाचे रेकॉर्डिग गिनिज बुककडे पाठविण्यात येणार आहे. येत्या ३ आठवडय़ांत हा विक्रम झाल्याचे प्रमाणपत्र ओगले यांना प्राप्त होईल असे परीक्षकांनी सांगितले.