सिप्ला परिहार सेवा केंद्राच्या वतीने ‘जागतिक परिहार सेवा दिना’ निमित्त अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या उपस्थितीत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर्स, नर्सेस, विद्यार्थी, विविध क्लब्ज व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचा या पदयात्रेत समावेश होता.
परिहार दिनानिमित्त ‘आसरा फाउंडेशन’, ‘संवेदना सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन’, ‘भगिनी निवेदिता प्रतिष्ठान’ व ‘आपलं घर’ या समाजसेवी संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात आला. समाजाचे केलेले पुनरुत्थान, दुर्लक्षित मुले व वृद्धांचे जीवन उंचावणे या कार्यासाठी या संस्थांना सन्मानित करण्यात आले.
‘गेल्या पंधरा वर्षांत केंद्रातर्फे आठ हजार पेक्षा जास्त कर्करुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच पदयात्रेमुळे परिहार सेवेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्यामुळे समाजाचा अधिक फायदा होईल’, असे मत सेवा केंद्राचे विश्वस्त एस. व्ही. अय्यर यांनी व्यक्त केले. पदयात्रेत सहभागी होणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल सेवा केंद्राच्या वैद्यकीय संचालिका डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केले.