पुढील वर्षांत एप्रिलमध्ये सोलापुरात प्रथमच जागतिक उर्दू साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्याची पूर्वतयारी केली जात आहे. ज्येष्ठ उर्दू साहित्यिक डॉ. गोपीचंद नारंग यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या तीन दिवसीय संमेलनासाठी जागतिक दर्जाचे अनेक नामवंत उर्दू साहित्यिकांना निमंत्रित करण्यात येत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
दि. २६, २७ व २८ एप्रिल रोजी पार्क स्टेडियम व हुतात्मा स्मृतिमंदिरात भरणाऱ्या या उर्दू साहित्य संमेलनात कादंबरीकार, कवी, लेखक, साहित्य समीक्षक, गझल गायक, नाटककार व ज्येष्ठ पत्रकारांचा मेळा भरणार आहे. यात डॉ. सय्यद तकीआबदी (कॅनडा), डॉ. सिफात अलवी (बेटफोर्ड), अशरफ गील (कॅलिफोर्निया), जियाउद्दीन शकीब, साबीर इर्शाद उस्मानी, डेव्हिड मॅथ्युज (लंडन), सय्यद मेराज जामी, नासीर बगदादी (कराची),  प्रा.शहेबाज आलम (दुबई), हैदर कुरेशी (जर्मनी), डॉ.मुझफ्फरोद्दीन फारूखी (अमेरिका), प्रा. जॉन शिजॉन (चीन) हे जागतिक दर्जाचे उर्दू साहित्यक, लेखक व कवी येणार आहेत. याशिवाय जावेद अख्तर, निदा फाजली, गुलजार, नवाव मलिकजादा मंजूर, श्रीकृष्ण निजाम, बेकल उत्साही, मुनव्वर राणा, गुलजार देहलवी, हसन कमाल आदींना निमंत्रित करण्यात आल्याचे संयोजन समितीचे प्रमुख तौफिक शेख यांनी सांगितले.
या संमेलनात उर्दू साहित्य, भाषा व संस्कृतीसह विविध विषयांवरील भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी उर्दू साहित्य रसिकांना मिळणार आहे. जागतिक उर्दू मुशायऱ्याची मैफल विशेष रंगणार आहे. उर्दू रंगभूमी-काल, आज आणि उद्या, उर्दू कथेचे स्वरूप, उर्दू पत्रकारितेची सद्य:स्थिती आदी विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली जाणार असल्याचे शेख यांनी सांगितले.