* तहसीलदारांचे आश्वासन
* नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण मागे
पाऊस आणि गारपिटीमुळे निकृष्ट होत असलेल्या कांदा पिकाचे शासकीय नियमांनुसार पुनर्निरीक्षण करण्याचे आश्वासन तहसीलदार शरद मंडलिक यांनी दिल्याने तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तीन एप्रिलपासून सुरू केलेले उपोषण मागे घेण्यात आले.
गारपीट आणि पावसामुळे तालुक्यातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. शासकीय पातळीवरील पंचनाम्याचा सोपस्कार उरकल्यानंतर हजारो हेक्टर कांदा पीक जमिनीत सडल्याचे दिसून येत आहे. अशा निकृष्ट कांद्याला बाजारात कवडीमोल किंमत मिळत असल्याने अशा सर्वच पिकांचे पुनर्निरीक्षण करून पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी तालुक्यातील तळवाडे, डोंगरगाव, गवंडगाव, बदापूर, सायगाव, पिंपळगाव जलाल, आडगाव, नांदेसर, एरंडगाव या गावांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तीन एप्रिलपासून उपोषण सुरू केले होते. आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदार शरद मंडलिक, गटविकास अधिकारी अजय जोशी आणि तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण मागे घेतले. तत्पूर्वी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन प्रशासनाने आश्वासन न पाळल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.
सलग दोन वर्षे पडलेल्या दृष्काळामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांचा गारपिटीने घात केला. त्यामुळे शासनाने कोणतीही सबब न सांगता सर्व पीक कर्जाला विम्याचे संरक्षण द्यावे, गारपीटग्रस्तांना शक्य तितक्या लवकर भरपाई द्यावी, अद्याप पंचनामे न झालेल्यांचे त्वरीत पंचनामे करावेत, एक वर्षांचे वीज देयक माफ करावे, वसुली थांबवून व्याज माफ करावे आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले होते.
उपोषणकर्त्यांमध्ये संजय पगारे, बाळासाहेब आरखडे, बद्रीनाथ कोल्हे, संतुराम भागवत आदींनी उपोषण मागे घेतले. यावेळी संतु झांबरे, सुभाष पहिलवान पाटोळे, दत्ता महाले, अर्जुन कोकाटे, अनिस पटेल आदी उपस्थित होते.