भारतीय वायुसेनेच्या नागपुरातील बँक खात्यातून बनावट धनादेशाद्वारे सुमारे दोन कोटी रुपये काढून घेण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली असून चोरी गेलेल्या रकमेतील बहुतांश रक्कम गोठविण्यात तपास पथकाला यश आले आहे.
भारतीय वायुसेनेचा एक तळ नागपुरात असून अनुरक्षण कमांडही आहे. त्यांची कार्यालये वायुसेनानगरात आहेत. एअरफोर्स युनिटचे खाते भारतीय स्टेट बँकेच्या वायुसेनानगर शाखेत आहे. वर्ष अखेरच्या काही दिवसात दिलेला एक धनादेश वटविण्यासाठी या शाखेत आला. मात्र, एअरफोर्स युनिटच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो वटविण्यात आला नाही. ज्याला धनादेश देण्यात आला होता त्याने ही बाब युनिटच्या लेखाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. लेखाधिकाऱ्यांनी बँकेत चौकशी केली असता ही बाब खरी असल्याचे स्पष्ट झाले. त्याबरोबरच खळबळही उडाली. वायुसेना युनिट आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही स्टेट बँकेच्या वायुसेनानगर शाखेत धाव घेतली.
बँकेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. ०३८२४३ क्रमांकाचा धनादेश १४ लाख ५४ हजार ३०० रुपयांचा व ०३८२४४ क्रमांकाचा धनादेश १ कोटी ८१ लाख ४७ हजार ८०० रुपये असे एकूण १ कोटी ९६ लाख २९ हजार १०० रुपये रकमेचे धनादेश वटविण्यात आले होते. एवढय़ा रकमेचे धनादेश देण्यात आलेले नसल्याचे युनिटच्या अधिकाऱ्यांनी बँकेच्या निदर्शनास आणून दिले. वटविण्यात आलेल्या धनादेशांची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. एअरफोर्स युनिटचे सहायक सुरक्षा अधिकारी सुनील गोपालकृष्ण पल्लीथाली यांनी लगेचच या प्रकाराची गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, प्रत्यक्ष संरक्षण दलाच्या खात्यातून बनावट धनादेशाद्वारे रक्कम काढून घेतल्याने वायुसेना, पोलीस व बँक वर्तुळात खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तीनही विभागांच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलली. सुदैवाने ही बाब वेळीच उघड झाली. आज दिवसभर बँकेचे काही अधिकारी व पोलिसांचे एक पथक दिवसभर बँकेत तळ ठोकून होते. त्यांनी संगणकीय नोंदींची तपासणी सुरू केली. तांत्रिकदृष्टय़ा रक्कम काढून घेण्यात आली असली तरी ती इतर काही खात्यांमध्ये वळविण्यात आल्याचे निदर्शनास येताच संबंधित व्यवहार थांबविण्यात आले.
काढून घेण्यात आलेल्या १ कोटी ९६ लाख २९ हजार १०० रुपयांपैकी सुमारे साठ टक्क्याहून अधिक रक्कम सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. आज दिवसभर बँकेतील व्यवहारांच्या नोंदी तपासण्याचे काम सुरूच होते.