शहरात घरफोडी तसेच दुकाने फोडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने राबविलेल्या शोध मोहिमेत अट्टल गुन्हेगार हाती लागला. त्याच्याकडून ५०० ग्रॅम सोने व ३० किलो चांदीच्या दागिन्यांसह गुन्ह्यांत वापरलेली कार व दरोडा टाकण्यासाठी वापरलेले साहित् य असा २५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यात अंबड, गंगापूर व सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयिताने घरफोडीत लंपास केलेले सोन्या-चांदीच्या दागिन्यांचाही समावेश आहे. मध्यवर्ती कारागृहात ओळख झालेल्या पाच साथीदारांच्या मदतीने या संशयिताने मध्यप्रदेशमध्येही असेच उद्योग केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सोमवारी मध्यरात्री मालेगाव मोटार स्टँड परिसरात मालमोटार उभी करून चोरटय़ांनी गोदामातून लाखो रुपयांचा माल लंपास केला. दोन महिन्यांपूर्वी असाच प्रकार शहराच्या मध्यवर्ती रविवार कारंजा भागात घडला होता. एकाचवेळी चार ते पाच दुकाने फोडण्याचा प्रयत्न तेव्हा चोरटय़ांनी केला. या घडामोडींमुळे व्यापारी वर्गात घबराट पसरली असताना दुसरीकडे चोरी व घरफोडीचे सत्र अव्याहतपणे सुरू असल्याने नागरीकही हबकले आहेत. या एकंदर परिस्थितीत अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल असलेला भगवान एकनाथ पाटोळे (रा. दगडु पाटील चाळ, घारपुरे घाट) या गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केले. पाटोळे यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्या प्रकरणात कारागृहात असताना पाटोळेची मध्यप्रदेश व उज्जन येथील काही सराईत गुन्हेगारांशी ओळख झाली. त्यांच्या मदतीने पाटोळेने मध्यप्रदेशातील धारमधील राजगड गावात जवाहर महाजन यांच्या घरात दरोडा टाकला. तेथून संशयितांनी सोने व चांदीचे दागिने लंपास केल्याची कबुली पाटोळेने दिली आहे. त्याच्याकडे ५०० ग्रॅम सोने व ३० किलो चांदी असा मुद्देमालही हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अकील शेख व सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गिरासे यांनी दिली. सरकारवाडा, अंबड व गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयिताने या स्वरुपाचे गुन्हे केले. त्यावेळी लंपास केलेल्या सुमारे ७० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा हस्तगत केलेल्या मुद्देमालात समावेश असल्याचे गिरासे यांनी सांगितले.