उरण चिर्ले येथील वैष्णवी लॉजिस्टिक गोदामातून रविवारी ३१ लाख २६ हजार ९५ रुपयांचा माल चोरीला गेल्याची तक्रार उरण पोलिसात नोंदविण्यात आली असून या प्रकरणी तपास करून पोलिसांनी ठाणे कापूर बावडी येथून माल हस्तगत केला आहे. मात्र मालाची चोरी करणारा आरोपी कंटेनर चालक शंभू राम बीकश फरारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उरण पोलिसांनी रविवारी चोरीला गेलेला माल सोमवारी म्हणजे चोवीस तासांच्या आत हस्तगत केला.
फिर्यादी सादिक हुसेन यासीन शेख यांनी आपल्या सहा लाखांच्या वाहन व तीन लाखांच्या कंटेनरसह कंटेनरमधील २२ लाखांचा भंगाराचे सामान असा एकूण ३१ लाखांचा माल चोरी झाल्याची तक्रार उरण पोलिसात नोंदविली होती. याचा तपास उरण पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एम. आव्हाड करीत होते. त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता उरणवरून तारापूरला जात असलेला मालाचा कंटेनर ठाण्यातील कापूरबावडी येथे आढळून आला आहे.मात्र या मालाची चोरी करणारा कंटेनर चालक फरारी झाला आहे. त्याचा शोध उरण पोलीस घेत असल्याची माहिती उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी दिली आहे.