शहर व परिसरात गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरू असतानाच शहर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष पथक बरखास्त करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक कार्यालयाने घेतला! शहरातील वजिराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर व विमानतळ पोलीस ठाण्यांसाठी कार्यरत असलेल्या शहर उपविभागासाठी उपअधीक्षकांनी विशेष पथकाची स्थापना केली होती.
शहरातील गंभीर गुन्ह्यांची उकल व्हावी, प्रतिबंधात्मक कारवाई तत्परतेने व्हावी, अवैध व्यवसायावर अंकुश बसावा, या हेतूने या पथकाची स्थापना केली असली, तरी प्रत्यक्षात मात्र अवैध धंदे थांबविण्यास पथकाने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. अवैध धंद्यांबाबत वरिष्ठांना माहिती देण्याचे सौजन्यही दाखवले नाही. भाग्यनगर, शिवाजीनगर ठाण्यांच्या हद्दीतील अवैध व्यवसायांवर इतवारा उपविभाग अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर पथकाचे पितळ उघडे पडले.
शहर उपविभागात साखळी चोरी, घरफोडी, दरोडा, लुटमार यांसारख्या गुन्ह्यांची मालिका सुरू असताना या विशेष पथकाने गेल्या ६ महिन्यांत कोणतीही दखलपात्र कारवाई केली नाही. एखाद्या गंभीर गुन्ह्याची उकल करण्यातही पथकाला यश आले नाही. दोन आठवडय़ांपूर्वी पथकातील कर्मचाऱ्यांनी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी प्रवीण जेठेवाड यांना मारहाण केली. कोणत्याही सबळ कारणाशिवाय सराईत गुन्हेगाराप्रमाणे या कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याने जेठेवाड यांना गंभीर दुखापत झाली. मात्र, आपल्यावरील अन्यायाविरोधात त्यांनी उपोषणाचे हत्यार पाजळताच या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले. अतिरिक्त अधीक्षक तानाजी चिखले  हे जेठेवाड मारहाण प्रकरणी चौकशी करीत आहेत. या पाश्र्वभूमीवर हे वादग्रस्त पथक बरखास्त करण्याचा निर्णय अतिरिक्त अधीक्षकांनी घेतला. तसे आदेश जारी केल्यानंतर या पथकातील काही कर्मचाऱ्यांना मुळ नियुक्तीवर परत पाठविण्यात आले. अतिरिक्त अधीक्षकांच्या या निर्णयाचे पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. या पथकाचा पोलीस ठाण्यांतल्या वेगवेगळ्या प्रकरणांत नको तेवढा हस्तक्षेप होता. ‘साहेबांचे पथक’ म्हणून कोणी त्यांना विरोध करीत नव्हता, असे सांगण्यात आले.
अतिरिक्त अधीक्षक चिखले यांनी, शहर उपविभागीय अधिकाऱ्यांचे विशेष पथक बरखास्त करण्यात आल्याचे स्पष्ट केले. जेठेवाड यांना मारहाणीची चौकशी सुरू करण्यात आली. या अनुषंगाने जाबजबाब नोंदविण्याचे काम सुरू झाले. या प्रकरणी सखोल चौकशी करून वास्तवदर्शक अहवाल अधीक्षकांना लवकरच सादर करण्यात येईल. जेठेवाड यांना मारहाण, तसेच अन्य काही तक्रारीमुळेच हे पथक बरखास्त केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.