खड्डय़ांतील मुंबईतून बस, टॅक्सी, रिक्षातून प्रवास करणाऱ्यांचे कंबरडे खिळखिळे होऊ लागले आहे. परिणामी मान, मणका, गुडघेदुखीने त्रस्त झालेल्या रुग्णांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
थातुरमातूर कामे करून महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी मुंबईकरांना पुरते खड्डयात टाकले आहे. या खड्डयांमुळे बस, टॅक्सी, रिक्षातून थोडय़ा अंतरासाठीही तासन्तास प्रवास करावा लागत आहे. जागोजागी खड्डय़ांमध्ये ठेचा खात चालणाऱ्या वाहनांमुळे प्रवाशांची कंबर आणि मणके खिळखिले होत आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये खड्डय़ात अडखळून पाय मुरगळणे, प्रवासादरम्यान गचके बसल्यामुळे मान लचकणे, गुडघे, मणका दुखीच्या तक्रारी घेऊन मुंबईकर खासगी आणि पालिका रुग्णालयांमध्ये धाव घेऊ लागले आहेत. मुंबई खड्डेमय होऊ लागताच पालिकेच्या रुग्णालयात अशा रुग्णांच्या संख्येत सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
प्रवासादरम्यान बसणाऱ्या गचक्यांमुळे बेसावध प्रवाशांना मान, गुडघे, मणके दुखीचा त्रास होतो. जुन्या टॅक्सी आणि रिक्षांमधून प्रवास करताना मोठय़ा प्रमाणावर गचके बसून मान, पाठ, मणका दुखीने बेजार झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या रुग्णांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती, केईएममधील डॉ. प्रदीप भोसले यांनी दिली.
 मणक्यावर अथवा गुडघ्यावर शस्त्रक्रिया केलेल्या व्यक्तीला प्रवासादरम्यान खड्डामुळे अचानक गचका बसला तर प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात. तसेच त्याला दीर्घकाळ उपचारही घ्यावे लागतात. काही वेळा शरीरात बसविलेल्या प्लेट्स तुटल्याचेही निदर्शनास आले आहे, असेही
डॉ. भोसले म्हणाले.