वाचनसंस्कृती लोप पावतेय याचा दोष वाचकांवर लावण्यापेक्षा आपले वाचन वाचले का जात नाही याचा विचार नव्या लेखकांनी करण्याची गरज आहे. सरधोपट साहित्य निर्मिती होत असेल आणि लिखाणातून वाचकाला अर्थाची वलये निर्माण करता येणार नसतील, तर वाचक अशा लिखाणाकडे वळणारच नाही. याच कारणामुळे ९०च्या दशकानंतरचे साहित्य मोठय़ा प्रमाणात  वाचले जात नाही, अशी परखड टीका साहित्यिक व मुंबईच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांनी केली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा मराठी विभाग व यशवंतराव चव्हाण विभागीय प्रतिष्ठानच्या आयोजित ‘समकालीन मराठी वास्तव’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे बीजभाषक म्हणून ते बोलत होते.
नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले तर साहित्यिक डॉ. राजन गवस अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर मराठी विभागाचे विभागप्रमुख डॉ.अक्षयकुमार काळे व डॉ. प्रमोद मुनघाटे उपस्थित
होते.
 विसाव्या विसाव्या शतकातील साहित्याला आता ऐतिहासिक साहित्य म्हणावे लागेल. आता माणूस निरीक्षण व सर्जनही करतो आहे.
ग्रामीण, दलित, विज्ञान व स्त्री साहित्य आता मुख्य प्रवाहात सहभागी होऊ लागले आहे. मराठी भाषेच्या अस्तित्वाची चिंता करण्याचे कारण नाही व मराठी मरेल असे भय बाळगण्याचेही कारण नाही, असे ते
 म्हणाले. ‘महाराष्ट्राबाहेरील लोकांनी मराठी टिकवली आहे व खरी गरज मराठी महाराष्ट्रात टिकवण्याची आहे. इतर भाषा शिकल्या की आपल्या भाषची लाज वाटत नाही, मराठी बद्दलचा न्यूनगंड कमी होतो व मराठीचे मोलही कळते,’ असे डॉ. देशपांडे म्हणाले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी नव्या पिढीत मराठी रूजविणाऱ्या प्राथमिक शाळा बंद पडत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ‘एखादी भाषा बोलणारे जेव्हा सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवनात कर्तबगारी दाखवतात तेव्हा त्या व्यक्तींच्या भाषेचाही प्रभाव वाढत असतो.
मराठी भाषिकांमध्ये मराठीबद्दल न्यूनगंड व मानसिक गुलामी असल्याचे जाणवते. मनाची ही गुलामी दूर होणे गरजेचे आहे,’ असे ते म्हणाले. मराठी माणसांनी एकमेकांच्या चांगल्या कामांचे कौतुक करण्याची संस्कृतीही विकसित करावयास हवी, असेही कुलगुरू म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात राजन गवस यांनी दाभोळकर व पानसरे यांच्या खुनाचे दाखले देत थेट बोलणाऱ्या कलावंतांना यानंतर मरणाचीच तयारी ठेवावी लागेल असे मत व्यक्त केले.
व्यक्ती निर्माण करणारे मूल्यात्मक शिक्षण आज राहिले नसून व्यक्तिमत्व विकासाऐवजी पाल्यांना एटीएम बनवण्याकडे पालकांचा कल असल्याचा आरोप त्यांनी केला. आज सगळे ग्राहक झाले असून माणूस शिल्लक राहिलेलाच नाही, असेही मत त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले.
डॉ. काळे यांनी प्रास्ताविक, डॉ.अमृता इंदूरकर यांनी संचालन तर डॉ. मुनघाटे यांनी आभार मानले.