जीवनात मला अनेक अनुभव आले आणि मनामनाशी नाती जोडली गेली. तसेच जीवनात भेटलेल्या विविध माणसांनी माझे कथाविश्व आणि लेखणी समृद्ध झाली, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांनी नुकतेच मुंबईत वांद्रे येथे केले.
कोकण मराठी साहित्य परिषद-वांद्रे शाखा आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल कीर यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी कीर बोलत होत्या. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, ‘कोमसाप’चे अध्यक्ष महेश केळुस्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी बोलताना कर्णिक म्हणाले, कीर यांना लिखाणाद्वारे जगण्याचे प्रयोजन सापडले असून त्यातून समाज आणि वाचकांना दिशा मिळाली आहे. केळुस्कर यांनी सांगितले, कीर यांचे लेखन हे केवळ कल्पनाशक्तीवर आधारित नसून त्या लेखनाला सामाजिक कार्यकर्तीची जोड आहे व त्यामुळे हे लेखन कसदार ठरते.
या वेळी वसंत बंदावणे, रेखा नार्वेकर, वसंत सैतावडेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. नमिता कीर यांनी गिरिजा कीर यांनी लिहिलेल्या ‘माझ्या आयुष्याची गोष्ट’ या कादंबरीचा आढावा घेतला तर गौरी कुलकर्णी यांनी कीर यांच्या जीवनावर आधारित कविता सादर केली. ज्योती कपिले यांनी प्रास्ताविक तर श्रीकांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संजय जाधव यांनी आभार मानले.