डान्स बारविरोधी मंचाचा आरोप
डान्स बारवरील बंदीमुळे ७५ हजार बारबाला बेरोजगार झाल्याचा ‘डान्स बार असोसिएशन’तर्फे करण्यात येणारा दावा अतिशयोक्त असून बारमालक आपल्या आर्थिक फायद्यासाठी बारबालांचा आकडा विनाकारण फुगवीत असल्याचा दावा ‘डान्स बारविरोधी मंचा’द्वारे करण्यात आला आहे.
महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या, तरुण पिढीला भोगवादी, चंगळवादी व गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळविणाऱ्या, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त करणाऱ्या राज्यातील सर्व डान्स बारवर बंदी कायम ठेवावी यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांचा समावेश असलेल्या मंचातर्फे नुकतीच आझाद मैदानात निदर्शने करण्यात आली. याशिवाय आमदार विद्या चव्हाण, अलका देसाई, चित्रा वाघ, स्मिता वाघ आदी महिला आमदारदेखील या निदर्शनात सहभागी झाल्या होत्या.
मुंबईत २९४ डान्स बार आहेत. जर मुंबई व राज्यातील इतरत्र असलेल्या डान्स बारची संख्या १२०० धरली व अंदाजे डान्स बारमध्ये १२-१५ मुली कामाला असाव्यात असे जरी मानले तरी एकूण मुलींची संख्या १५ ते १८ हजापर्यंत होऊ शकते. डान्स बार असोसिएशनने ७५ हजार ही संख्या फुगवून सांगितलेली असल्याचे स्पष्ट होते, असे मंचाचे म्हणणे आहे. डान्स बार ही महिलांच्या शोषणाची केंद्रे आहेत, असा मंचाचा मुख्य आक्षेप आहे. डान्स बारमध्ये महिलांना कोणताही पगार दिला नाही. उलट तिलाच पैसे कमावून त्यातला मोठा वाटा डान्स बारच्या मालकाला द्यावा लागतो. गिऱ्हाइकाने अधिक बक्षिसी द्यावी म्हणून तिला कामुक हातभाव करत नृत्य करावे लागते. कधी-कधी समोरचे पुरुष दारू पिऊन तर्र झालेले असतात. रात्री उशिरा येथील महिलांना सुरक्षितपणे घरी सोडण्याची कोणतीही जबाबदारी बारमालक घेत नाही. अशा परिस्थितीत उपजीविका करावा लागणारा हा मार्ग प्रशस्त कसा, असा सवाल मंचाने केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 6, 2013 8:30 am