जागतिक प्रेम दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे प्रेमवीरांच्या उत्साहाला उधाण येणे साहजिकच. परंतु, पिंपळगाव बसवंत येथील एका प्रेमवीराला त्याचा हा उत्साह मात्र चांगलाच महाग पडला. भ्रमणध्वनी अन् व्हॉट्स अपच्या जमान्यात त्याने आपली भावना व्यक्त करण्यासाठी प्रेमपत्राचा आधार घेतला. या प्रकाराने त्रस्तावलेल्या महाविद्यालयीन युवतीने मैत्रिणींच्या सहकार्याने प्रेमवीराला चांगलाच चोप दिला.
शहर परिसरातील जवळपास सर्वच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जागतिक प्रेम दिनाचे वेध लागले आहेत. शहरी भागाप्रमाणे या दिनाबद्दल ग्रामीण भागातही आकर्षण आहे. त्याचे प्रत्यंतर पिंपळगाव बसवंत येथील घटनेवरून आले. पिंपळगाव बसवंत येथील महाविद्यालयात आसपासच्या गावांमधून विद्यार्थी येतात. या ठिकाणी शिक्षण घेणारा युवक महाविद्यालयातील एका युवतीच्या प्रेमात पडला. भ्रमणध्वनी नसल्याने त्याने प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी पत्राचा आधार घेतला. सलग काही दिवस तो महाविद्यालय ते बसस्थानक या परिसरात ही प्रेमपत्र टाकू लागला. आठवडाभर चाललेली ही कसरत संबंधित युवतीच्या लक्षात आली. तेव्हा हे प्रेमपत्र असल्याचे निदर्शनास आले. प्रेमपत्रात ‘आपण तुझ्या उत्तराची प्रतीक्षा करत आहोत’ असेही प्रेमवीराने नमूद केले होते. या प्रकाराने युवती चक्रावून गेली. काय करावे हे तिला सुचेना. घरी सांगितले तर शिक्षण बंद होण्याची भीती, पोलिसांकडे जावे तर नाहक त्रास होण्याची शक्यता यामुळे वैतागलेल्या युवतीने आपल्या मैत्रिणींशी चर्चा केली. त्यानंतर मग एका स्थानिक पत्रकाराशी चर्चा करून पुढे काय करायचे हे निश्चित करण्यात आले. त्यानुसार या प्रेमपत्राला उत्तर देऊन त्यावर भेटण्याची जागा व वेळ ठरवून ते पत्र प्रेमवीराकडे सोपविण्यात आले. प्रेमपत्र युवतीपर्यंत पोहोचल्याने आणि भेटीची वेळही निश्चित झाल्यामुळे प्रेमवीर भलताच आनंदात होता.  शासकीय दवाखान्याजवळील गणपती मंदिरात निश्चित वेळेआधी तो जाऊन बसला. दुपारी एक वाजता संबंधित युवतीही या ठिकाणी पोहोचली. मंदिरातील एका बाकावर ती जाऊन बसली. तिच्याशी बोलण्याची संधी मिळाली असे समजून प्रेमवीरही तिच्या शेजारी जाऊन बसला.
 हा घटनाक्रम सुरू असतानाच पाच युवतींचा गट मंदिरात दर्शनासाठी पोहोचला.  त्यानंतर बाहेर आल्यावर या सर्व युवतींनी आपले जोडे हातात घेतले आणि पुढे मागे काहीही न पाहता प्रेमवीराला प्रसाद देण्यास सुरूवात केली. प्रेमवीराला धडा शिकविण्यासाठी युवतींनी योजलेल्या युक्तीची सध्या पिंपळगाव बसवंतमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे.