देशातील अग्रगण्य सेंट्रल बँक ऑफ इंडियाने शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक बांधीलकीच्या माध्यमातून पुढाकार घेताना दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरलेल्या ‘लोकसत्ता -यशस्वी भव’ उपक्रमाला सढळ सहकार्य दिले. बँकेच्या ठाणे विभागीय कार्यालयाने ठाणे, रायगड व रत्नागिरी जिल्ह्य़ातील एकूण १२५० विद्यार्थ्यांना यशस्वी भव उपक्रमातून दररोजची लोकसत्ता आवृत्ती व यशस्वी भव मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध करून दिली होती. या उपक्रमामुळे १० शाळांचे निकाल खूप सुधारले असून  ८५ ते ९०% गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
सेंट्रल बँकेने पुरस्कृत केलेल्या डोंबिवलीतील दत्त नगर येथील स्वामी विवेकानंद शाळेतील प्रसाद बळवंत गुजर या विद्यार्थ्यांने ९६.३६% गुण मिळवून धवल यश प्राप्त केले. सेंट्रल बँकेच्या पुढाकाराने ‘यशस्वी भव’चे मार्गदर्शन मिळाल्यानेच परीक्षेत उत्तम गुण मिळवता आल्याचे प्रसादने सांगितले. मातोश्री सरलाबाई म्हात्रे विद्यालयातील आर्थिक अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना यशस्वी भव उपक्रमाचा प्रचंड फायदा झाला. शाळेचा निकाल ८०% लागला. रतिका मनवल या विद्यार्थिनीला ८८% गुण मिळाले.
त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्य़ातील पोलादपूरजवळ असलेल्या अति दुर्गम भागातील कापडे बुद्रुक या शाळेचा निकाल ९७.६०% लागला. सारिका सकपाळ या विद्यार्थिनीने ८६.९१% गुण प्राप्त केले. अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयातील ४६५ विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा विशेष लाभ झाला. डोंबिवलीतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर व रामचंद्रनगर या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनादेखील ‘यशस्वी भव’ उपक्रमाची खूप मदत झाली. आदर्श विद्यालय, डोंबिवली या शाळेतील श्रुती गद्रे या विद्यार्थिनीला ९२% गुण मिळाले. सेंट्रल बँकेचे विभागीय व्यवस्थापक सुनील चव्हाण यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शाळेतील शिक्षकांचे अभिनंदन केले. या शैक्षणिक उपक्रमाकरिता बँक सातत्याने विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही दिली. चालू शैक्षणिक वर्षांत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे बँकेने ठरविले असून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देऊ असे चव्हाण यांनी आश्वासन दिले.