दहावीच्या विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड दूर करत शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशाने कोपरखैरणे येथील ज्ञानविकास माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘यशस्वी भव’ या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘लोकसत्ता’च्या सहकार्याने ‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’ने आयोजित केलेल्या या उपक्रमांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल अशा ‘लोकसत्ता यशस्वी भव’ या पुस्तकाचे वितरण यावेळी करण्यात आले. ‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’चे नवी मुंबई येथील प्रमुख विजय शानभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ज्ञानविकास संस्थेचे अध्यक्ष अॅड. पी. सी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या पुस्तकाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मोरेश्वर पाटील, उपाध्यक्ष गजानन पाटील, खजिनदार महादेव पाटील, संचालिका जयश्री पाटील यांच्यासह मुख्याध्यापक डी. बी. ठेंगील आदी मान्यवर उपस्थित होते.