‘संहिता’, ‘तुझा धर्म कोणता?’, ‘राजा हरिश्चंद्र’, ‘कालियामर्दन’ इत्यादी मराठी चित्रपट व मूकपट दाखविणार
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने गेल्या दोन वर्षांपासून सुरू झालेल्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष असून १९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन  केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते केले जाणार आहे. पुणे फिल्म फाऊण्डेशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या महोत्सवात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना चव्हाण यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. या वेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस शरद काळे हेही उपस्थित होते. यंदा यशवंतराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष असून त्याचबरोबरच भारतीय चित्रपटाचेही शताब्दी वर्ष असल्याने या महोत्सवात मूकपट दाखविण्यात येणार आहेत. आशय फिल्म क्लब या पुण्यातील आघाडीच्या फिल्म सोसायटीच्या पुढाकाराने पुण्यात होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील चित्रपट मुंबईकरांनाही पाहता यावेत म्हणून यशवंत चित्रपट महोत्सव भरविण्यात येतो. यंदाच्या महोत्सवात ११२ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. यामध्ये विविध ५० देशांतील चित्रपट, २३ लघुपट, गाजलेले मूकपट, फिल्म्स डिव्हिजनकडील दुर्मीळ माहितीपट यांचा समावेश आहे. ‘कालियामर्दन’ या मूकपटाबरोबरच ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला मूकपटही दाखविण्यात येणार आहे. २५ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालयासमोर व सचिवालय जिनखान्याशेजारी, नरिमन पॉईण्ट येथे सुरू झाली आहे.