शिक्षण मंडळ कराड या संस्थेतर्फे दिला जाणारा ‘यशवंत भूषण पुरस्कार’ रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी अॅड. रावसाहेब शिंदे यांना जाहीर झाला असल्याची माहिती शिक्षण मंडळचे चेअरमन मुकुंदराव कुलकर्णी यांनी दिली.
पुरस्कार प्रदान सोहळा येत्या २७ एप्रिल रोजी सायं. ६ वाजता लाहोटी कन्याप्रशालेच्या सभागृहात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते होणार आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण हे शिक्षण मंडळच्या टिळक हायस्कूलचे नामवंत माजी विद्यार्थी असून, त्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या मान्यवरास हा पुरस्कर दिला जातो. आजवर दिवंगत लोकनेते पी. डी. पाटील, मधुकरराव चौधरी तसेच ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी, मधु मंगेश कर्णिक, डॉ. विजय भटकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.