यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्यासाठी पत्री सरकारमध्ये काम केल्याने त्यांच्यात असलेली जिद्द ते संरक्षण खाते सांभाळताना दिसून आली. चीनने हल्ला केल्याने त्या वेळच्या सरकारला संरक्षण नावाचे क्षेत्र असल्याची जाणीव झाली. यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावताना, देशाची शस्त्रसंपत्ती वाढवली. सैन्य दलातून बाहेर गेलेल्यांना सन्मानाने बोलावून संरक्षण कौन्सिलची पुनर्रचना करून तुल्यबळ सैन्य उभे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सर्वाना बरोबर घेऊन जाण्याच्या त्यांच्या गुणामुळे सैनिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर होता,असे प्रतिपादन नौसेना दलातील निवृत्त अधिकारी विनायक अभ्यंकर यांनी केले.
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण स्मृतिदिनानिमित्त येथील पालिकेच्या नगरवाचनालयातर्फे आयोजित यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत ‘यशवंतराव चव्हाण यांचे संरक्षण क्षेत्रातील योगदान’ या विषयावर ते बोलत होते. नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे, महिला बालकल्याण सभापती संगीता देसाई आदी उपस्थित होते.
विनायक अभ्यंकर म्हणाले की, संरक्षण खाते मिळाल्यावर यशवंतरावांनी या क्षेत्रासंदर्भातील १६२ इंग्रजी पुस्तकांचे वाचन केले. त्यांनी १९६३ मध्ये अमेरिकेत जाऊन तेथील शस्त्रास्त्रे पाहून त्यांच्या खरेदीची तयारी केली. सैन्य जमवण्यासाठी पराकाष्ठा करावी लागणार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी त्यांनी सैनिकांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही घेतल्या. अपुरे सैन्य, अपुरा शस्त्रसाठा असणारे भारताचे सैन्य दल सक्षम करण्यासाठी त्यांनी १९६५ मध्ये रशिया दौरा केला. तेथे ‘पॅटेशिस करार’ केला. त्यामुळे दोन लढाऊ जहाजावरून जहाजांची संख्या ५० झाली. मिसाईलही मिळाले. १९६५ च्या युध्दात मिसाईलमुळे चव्हाणांनी रोवलेल्या बीजामुळे भारतीय सैन्याची शस्त्रसंपत्ती चांगली जमली. सैन्याच्या प्रशिक्षणालाही त्यांनी प्राधान्य दिले. अंदमान निकोबार बेटे त्यांच्यामुळेच भारतात आहेत. साडेतीन वष्रे संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणारे यशवंतराव चव्हाण त्या वेळी ५० वर्षांचे होते.