यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या कार्याची माहिती आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान एवढे मोठे आहे, की ते वाचून किंवा सांगून समजणार नाही. त्यांच्या कार्याचा अभ्यास करून ते यापुढे अखंडपणे सुरू ठेवण्याची गरज असल्याचे मत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, रयत शिक्षण संस्थेचे सचिव अरविंद बुरुंगले, सहसचिव नानासाहेब गायकवाड, प्राचार्य जे. जे. जाधव, माजी खासदार श्रीनिवास पाटील, वेणूताई चव्हाण कॉलेजचे प्राचार्य बी. एन. कालेकर, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन राजमाने, उपप्राचार्य आर. एन. पाटील आदींची उपस्थिती होती.
अ‍ॅड. शिंदे म्हणाले, की यशवंतराव चव्हाण यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचे कार्य संपूर्ण देशवासीयांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच त्यांच्या आदर्शवत जीवनावर ज्येष्ठ पत्रकार भावे यांनी अमेरिकेमध्ये सहा व्याख्याने दिली आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या कार्याची माहिती अमेरिकेच्या लोकांना जाणून घ्यायची होती म्हणून भावे यांनी चव्हाण यांचा जीवनपट त्यांच्यासमोर उलगडला.
भावे म्हणाले, की पंडित नेहरू, महात्मा गांधी अशा थोर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील थोर व्यक्तिमत्त्व असणारे यशवंतराव चव्हाण एक होत. संत गाडगेबाबा, वसंतदादा पाटील, विनोबा भावे, यशवंतराव चव्हाण यांना समजून घेतले पाहिजे. वसंतदादा, गाडगेबाबा यांना शिक्षण घेता आले नाही. पण त्यांनी आपल्या कार्यातून महाराष्ट्र गाजवला. आपण नकारात्मक भूमिका सोडायला हवी. तरच जीवनामध्ये यशस्वी होऊ. यशवंतरावांनी समाजातील लोकांना नाराज केले नाही, तर त्यांना बळ देण्याचे कार्य केले. प्रास्ताविक मोहन राजमाने यांनी केले.