‘गुढीपाडवा’ या  हिंदू नववर्षांच्या स्वागतासाठी शहराच्या विविध भागांतून नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येणार असून यावर्षी गंगापूररोड, महात्मानगर, तिडके कॉलनी, संभाजी चौक, योगविद्याधाम, कॉलेजरोड या परिसरांतून स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वागत यात्रा समितीही तयार करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षस्थानी के. जी. मोरे यांची निवड करण्यात आली आहे. नववर्ष स्वागत यात्रा समितीअंतर्गत या बैठकीत विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून समिती प्रमुख, सदस्य व नागरिकांची बैठक बुधवारी पूर्णवादनगरमधील पारनेरकर सभागृहात सायंकाळी सहा वाजता होणार आहे.
२०१३ च्या नववर्ष स्वागत यात्रा समितीतील इतर पदाधिकाऱ्यांमध्ये सचिवपदी अ‍ॅड. किशोर विग, उपाध्यक्षपदी देवदत्त जोशी तर कोषाध्यक्षपदी प्रा. अनिल भंडारे यांची निवड करण्यात आली. डोंबिवली, पुणे या शहरांप्रमाणेच नाशिक येथील हिंदू नववर्ष स्वागत यात्रांनी एक वेगळेच आकर्षण निर्माण केले आहे. या स्वागत यात्रांमधून परंपरा जपतानाच सांस्कृतिक कार्यक्रमांचेही जतन करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. नाशिकमध्ये सर्वप्रथम एकाच परिसरातून सुरू झालेली हिंदू नववर्ष स्वागत यात्रा आता शहराच्या विविध भागांतून निघू लागल्या असून या यात्रांमधील नागरिकांचा सहभाग दिवसेंदिवस वाढू लागला आहे.
यंदा होणाऱ्या कार्यक्रम आयोजनाच्या निमित्ताने ‘नववर्ष स्वागत यात्रा समिती’च्या व्यवस्थापन मंडळाची बैठक पूर्णवादनगरमधील पारनेरकर सभागृहात झाली. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजेपासून शहरातील वेगवेगळ्या परिसरांतून निघणाऱ्या या नववर्ष स्वागत यात्रांमध्ये त्या त्या परिसरातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने पारंपरिक वेशभूषेसह सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकारिणीने केले आहे.
नववर्ष स्वागत यात्रेच्या आयोजन बैठकीत विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
त्यामध्ये चित्ररथ, व्यासपीठ, प्रचार व प्रसार, प्रसाद वितरण, समन्वय, रांगोळी या समित्यांचा समावेश आहे. स्वागत यात्रांच्या यशस्वितेत या समित्यांचा प्रमुख हातभार राहात असून यात्रांमधील आकर्षक चित्ररथ हे वैशिष्टय़े राहात आले आहे.
परिसरातील नागरिकांनी समितीच्या बैठकांना तसेच कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन नववर्ष स्वागत यात्रा समितीचे पदाधिकारी व व्यवस्थापन मंडळ सदस्य महेश हिरे, प्रकाश दीक्षित, बापूसाहेब कोतवाल, सतीश भावे, अजित कुलकर्णी आदींनी केले आहे.