भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी कार्यकर्त्यांमध्ये कोणताही वाद नाही, आरोप-प्रत्यारोप असाही प्रश्न नाही, तसेच या पदासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीकाही केली नाही किंवा त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल  प्रश्न  निर्माण    केलेले  नाहीत, तर या पदासाठी आपण किती सक्षम आहोत एवढेच प्रत्येक उत्सूक उमेदवाराने म्हटले आहे, असे प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी लोकसत्ताजवळ स्पष्ट केले.
जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदाबाबत वाद असल्याबाबतचे वृत्त लोकसत्ताच्या शुक्रवारच्या अंकात प्रसिध्द झाल्याच्या संदर्भात प्रस्तृत वार्ताहरांशी दूरध्वनीवरून बोलतांना प्रेदशाध्यक्ष मुनगंटीवार म्हणाले की, सध्या पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत. पक्ष बळकटीकरणासाठी जिल्हाध्यक्षपद कोणाला द्यावे, याबाबत उमेदवारांची संख्या लक्षात घेऊन यवतमाळ जिल्ह्य़ाचे प्रकरण राष्ट्रीय अध्यक्षांकडून प्रदेश जिल्हाध्यक्षाकडे आले आहे, हे खरे आहे. त्यासाठी पक्षाच्या कोअर कमेटीत निर्णय घेऊन येत्या दोन-तीन दिवसात या पदी योग्य व्यक्तीची नियुक्ती केली जाईल. मिशन-२०१४ हे भाजपचे लक्ष्य गाठण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करणे जरुरीचे आहे आणि अशी क्षमता असलेल्या व्यक्तीमधूनच अध्यक्षपदासाठी निवड केली जाईल, असे ते म्हणाले.
येत्या २७ जानेवारीला ते यवतमाळात एका कार्यक्रमासाठी येणार असून ते दिवसभर येथे मुक्कामाला राहणार आहेत, पण त्यापूर्वीच या पदासाठी पात्र व्यक्तींची घोषणा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, या जिल्ह्य़ात भाजपच्या एकेका नेत्याचा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर एकेक गॉडफादर आहे. त्यामुळे जिल्ह्य़ाच्या राजकारणात केंद्रीय आणि राज्यस्तरीय नेते दखल देण्याच्या भानगडीत न पडता परस्परांकडे अंगुली निर्देश करीत असतात, असा जो उल्लेख लोकसत्ताच्या बातमीत होता त्याबाबत बोलतांना प्रदेशाध्यक्ष मुनगंटीवार म्हणाले की, माझा कोणताच गट नाही आणि कोणत्याच गटाचा मी नेता नाही. मला सर्व कार्यकत्रे आणि नेते समान आहेत.
जिल्हा भाजप अध्यक्षपदासंबंधी प्रस्तृत वार्ताहरास मिळालेली माहिती अशी की, या पदासाठी उमरखेडचे माजी आमदार उत्तम इंगळे आणि यवतमाळचे जेष्ठ कार्यकत्रे राजू डांगे हे दोघेच स्पध्रेत आहेत. उत्तम इंगळे हे पोलीस शिपाईपदाची नोकरी सोडून भाजप तिकीटावर उमरखेडमधून १९९५ मध्ये विधानसभेत निवडून आले होते.
त्यानंतर उमरखेड आणि आर्णी मतदार संघातून दोनदा पराभव पाहिल्यानंतर त्यांची पुन्हा उमरखेडमधून लढण्याची इच्छा आहे. ते स्वत अध्यक्षपदासाठी उत्सुक नसल्याचेही समजते, मात्र भाजपतील एक गट राजू डांगे यांना अध्यक्षपदापासून वंचित ठेवण्यासाठी उत्तम इंगळे यांचे नाव पुढे रेटत असल्याचीही चर्चा आहे.