तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेले पाच हजार ४९९ शेतकरी सरकारी अनुदानापासून अद्यापही वंचित आहेत.
तालुक्यातील ज्या ३६ गावांमधील आठ हजार ४६१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यापैकी दोन हजार ९६२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन कोटीपेक्षा अधिक रक्कम वर्ग करण्यात आली. परंतु अद्याप १९ गावांमधील पाच हजार ४९९ शेतकरी शासकीय मदतीची प्रतिक्षा करत आहेत. तालुक्यातील सावरगाव, धुळगाव, भाटगाव, दहेगाव, गवंडगाव, गारखेडा, दुगलगाव, वळदगाव, निमगावमढ, भायखेडा, सुरेगाव रस्ता, भुलेगाव, पिंपळखुटे बुद्रुक, सोमठाणदेश, पिंपळखुटे खुर्द आदीा १९ गावांमधील या शेतकऱ्यांची संख्या साडेपाच हजार आहे. फेब्रुवारीत गारपिटीने प्रचंड नुकसान झालेल्या रेंडाळे, पांजरवाडी, गारखेडे, न्याहारखेडे बुद्रुक, राजापूर, पिंपळगाव जलाल, आंबेगाव, देवळाणे, कोटमगाव आदी १७ गावातील दोन हजार ८६२ गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाल्याची माहिती तहसीलदार शरद मंडलिक यांनी दिली.
गारपिटीनंतर तयार झालेल्या दुषित हवामानामुळे ज्यांचे कांदा पीक नुकसानग्रस्त झाले अशा शेतकऱ्यांचे सातबारा उतारे पाहून त्यांचे पंचनामे करून त्यांनाही भरपाई देण्याची मागणी बदापूर येथील प्रगतीशील शेतकरी विष्णुपंत शिनगर व कचरु देवडे यांनी केली आहे.