शालेय विद्यार्थ्यांमध्ये संयम, एकाग्रता आणि धैर्य याचे बीजारोपण करण्यासाठी तसेच त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढावा व शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक योगासन स्पर्धेत शंभरपेक्षा अधिक शाळेतील दहा हजार विद्यार्थ्यांंनी योगासनाचे विविध प्रकार सादर करून ‘करा हो नियमित योगासन’ असा संदेश दिला. या योगासन स्पर्धेत सोमलवार हायस्कूल रामदासपेठ शाळेला प्रथम, धनवटे नगर विद्यालयाला द्वितीय तर हिंदू ज्ञानपीठ शाळेला तृतीय क्रमांक देण्यात आला.
योगमूर्ती जनार्दन स्वामी यांनी स्थापन केलेल्या जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षांनिमित्त योग प्रचार आणि प्रसाराच्या उद्देशाने गेल्या वर्षभरापासून विविध उपक्रम राबविले जात असताना त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी यशवंत स्टेडियममध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी अभिनव आणि आगळ्या वेगळ्या अशा योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, काँग्रेसचे शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, शिक्षणाधिकारी ठमके, प्रसिद्धी होमियोपॅथ डॉ. विलास डांगरे, संस्थेचे अध्यक्ष गिरीश मोडक, कार्यवाह आणि योगप्रचारक रामभाऊ खांडवे उपस्थित होते. स्टेडियममध्ये विविध शाळेतील हजारो विद्यार्थी एकत्र आल्यावर गुरुचे स्मरण करून योग स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी हजारो विद्यार्थ्यांनी एका लयीमध्ये मत्स्यासन, पर्वतासन, ताडकटीचक्रासन, वृक्षासन, पुष्पासन, गोमुखासन, प्राणायम आणि सूर्यनमस्कार आदी योगप्रकार सादर केले.
यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, जनार्दन स्वामींनी योग विद्येचे रोपटे लावल्यानंतर आज त्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे.आजच्या संगणकीय आणि जंकफूडच्या काळात विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग हाच एक उत्तम पर्याय आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित योगासने करावी. योगतज्ज्ञ रामभाऊ खांडवे गेल्या अनेक वर्षांपासून योगविद्येचे काम करीत आहेत. त्यांच्या कार्यात सर्वानी सहभागी व्हावे आणि योगाचा प्रचार व प्रसार करावा, असे आवाहन गडकरी यांनी केले. गिरीश गांधी यांचेही यावेळी भाषण झाले. रामभाऊ खांडवे यांनी प्रास्ताविकात योगासन स्पर्धेची माहिती दिली.
गेल्या दोन महिन्यापासून शहरातील विविध शाळांमध्ये योगाभ्यासी मंडळाच्या १५० योग शिक्षकांनी प्रशिक्षण दिल्यावर आज त्यांनी योगासन स्पर्धेचे मूल्यांकन केले. मूल्यांकन केल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. सर्व विजेत्या शाळेला नितीन गडकरी आणि गिरीश गांधी यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन श्रद्धा भारद्वाज आणि श्याम देशपांडे यांनी केले.   

स्पर्धेचा निकाल -सांघिकता- संचेती गर्ल्स हायस्कूल, लयबद्धता- पं. नेहरू विद्यालय मकरधोकडा, तालबद्धता- धनवटे नगर विद्यालय, आसनकृती- सोमलवार हायस्कूल रामदासपेठ, गती- गजानन विद्यालय, पूर्णस्थिती- सोमलवार हायस्कूल खामला, जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या- सेंट जोसेफ हायस्कूल जरिपटका, योगानुशासन- विदर्भ बुनियादी हायस्कूल, गणवेश -वंडरलँड हाययस्कूल, फिरता चषक सोमलवार हायलस्कूल रामदासपेठ.