राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) प्रवेश घेण्यासाठी घेण्यात आलेल्या ऑगस्ट २०१२ चा निकाल जाहीर झाला असून येथील राजीव गांधी सैनिकी शाळेचा योगेश वनवे या विद्यार्थ्यांने यश संपादन केले असून राज्यातील इतर सैनिकी शाळेतील एकूण सहा विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्य़ाच्या इतिहासात योगेश वनवे हा सैनिकी शाळेचा एकमेव विद्यार्थी ठरला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राजीव गांधी सैनिकी शाळेने कसोशीने प्रयत्न केले. चालू शैक्षणिक वर्षांत एन.डी.ए. प्रवेशाचे स्वप्न साकार करून योगेश वनवे या विद्यार्थ्यांने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. राज्यातील सैनिकी शाळांमधून विदर्भातून गोंदियाच्या मनोहरभाई पटेल सैनिकी  शाळेचा विनय बिसेन, सांगली जिल्हातील तासगाव येथील दादोजी क ोंडदेव सैनिकी विद्यालयाचे विजय पंसुरे व एस.सैफ अली, ठाण्याच्या भारतीय विद्यालयाचा  निलेश बालू पाटील, माशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलचा आदित्य फडणीस व नगरच्या पद्मश्री विखे पाटील विद्यालयाचा निखिल आल्हाट आदि सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एन.डी.ए.च्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सैनिकी शाळेचे क मांडंट बिक्रम थापा, प्राचार्य रवींद्र पडघान व प्रशासकीय अधिकारी एन.बी. राजपुत यांचे मार्गदर्शन लाभले. या यशात ज्युनिअर कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे यश संपादन केले आहे. बुलढाणासारख्या अविकसित जिल्ह्य़ातून एन.डी.ए. साठी विद्यार्थी निर्माण होऊ शकतात, हे सैनिकी शाळेच्या सांघिक प्रयत्नाने सिध्द झाले आहे. संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ माळी, संस्थेचे सचिव रामभाऊ भराड, उपाध्यक्ष अन्नू सौदागर, कोषाध्यक्ष विद्याताई माळी यांनी योगेश वनवे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.