रंगभूमी, चित्रपट किंवा मालिका अशा कोणत्याही माध्यमात काम करणाऱ्या कलावंतांनी आपल्या कामाशी प्रामणिक राहून, श्रद्धेने काम करावे. व्यावसायिक म्हणून काम करातानाही काहीतरी वेगळे, नवे देण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट अभिनेते भरत जाधव यांनी केले.
शांतीकुमार फिरोदिया मेमोरिअल फाऊंडेशन व महावीर प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय महाकरंडक एकांकिका स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ‘हौशी ते व्यावसायिक’ असा प्रवास उलगडणारा परिसंवाद यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात झाला. या परिसंवादात अभिनेते भरत जाधव, दिग्दर्शक केदार शिंदे व निर्माता, दिग्दर्शक सुजय डहाके सहभागी झाले होते. त्या वेळी जाधव यांनी वरील मत व्यक्त केले. अभिजित दळवी यांनी तिघांना बोलते केले. त्यात श्रोतेही सहभागी झाले होते.
भरत जाधव म्हणाले, की हौशी व व्यावसायिक असा सध्या फारसा फरक राहिलेला नाही. परंतु व्यावसायिकतेतून काही प्रश्न निर्माण होत असले तरी हौशीतही व्यावसायिकपणा हवाच. तो पुणे, मुंबई वगळता इतर शहरांतील कलाकारांमध्येही येऊ लागला आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्याचा आनंदही होतो आहे. तसा तो एकांकिकासारख्या स्पर्धेतही यायला हवा. सध्या मराठी नाटकंही चांगली येत आहेत, परंतु त्यात तेच तेच कलावंत आहेत, नवे कलावंत यायला हवेत.
चित्रपट, मालिकांमधील कलावंत सध्या मोबाइलमध्ये खूप अडकले आहेत. दिग्दर्शक काही सांगतो, त्यात नटाचाही सहभाग हवा. परंतु नट सारखे मोबाइलमध्ये, ‘व्हॉट्स अप’मध्ये अडकलेले मी पाहतो. काम करायचे तर श्रद्धेने करा, प्रामाणिकपणे करा, रंगभूमीवरच्या नटरंगाची आपण पूजा करतो, तो जागरूक असतो, पैसा, यश नंतर येतच असते. आधी कामाशी प्रामाणिकपणा हवा, असेही भरत जाधव म्हणाले.
आमचा हौशी ते व्यावसायिक असा प्रवास झाला आहे. आता व्यावसायिक ते हौशी असा प्रवास सुरू झाल्याचे स्पष्ट करून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नवीन कलाकारांना केवळ ग्लॅमरसाठी या क्षेत्रात यायचे असेल तर वेळ व पैसाही फुकट जाईल. त्याऐवजी काम करून त्यांनी लक्ष वेधून घ्यावे. भूमिका करताना प्रथम भाषेची शुद्धता हवी. जे कराल ते मनापासून करा, हौशीतच आपला पाया पक्का करा, यश आपोआप पायापाशी येईल, असा सल्लाही त्यांनी दिला.
निर्माता, दिग्दर्शक सुजय डहाके यांनी आपल्याला चित्रपटाची आवड कशी निर्माण झाली, हे विशद केले. सुजय यांनी फिलिपाईन्समध्ये दिग्दर्शनाचा अभ्यास केल्यानंतर आता ऑस्ट्रेलियात पीएच.डी.चा अभ्यास सुरू केला आहे. चित्रपट, दिग्दर्शनाच्या माध्यमात प्रचंड ताकद आहे, हेही त्यांनी विविध उदाहरणांतून स्पष्ट केले. महाकरंडक एकांकिका स्पर्धेतील बारकावे आपल्याला भावल्याचे त्यांनी सांगितले.
तिघा कलावंतांनी अक्षय म्हस्के, सलीम शेख, अश्विनी पडवळकर, ज्ञानेश्वर करडे आदींनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन केले.