मध्य प्रदेशातील खांडवा येथील कारागृह फोडून पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा माग काढताना तिघा दहशतवाद्यांना पकडण्यात आले असून त्यांना मदत केल्याप्रकरणी सोलापूरच्या दोन तरुणालाही ताब्यात घेण्यात आले आहे. खांडवाच्या पोलीस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली व पुण्याच्या दहशतवादीविरोधी पथकासह सोलापूरच्या गुन्हे शाखेच्या साह्य़ाने या तरुणाला पकडण्यात आले.
म. सादिक अ. वहाब लुंजे (वय ३५, रा. मुस्लीम पाच्छा पेठ, सोलापूर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. खांडवा येथे कारागृहात स्थानबद्ध असलेल्या अबू फैसल यासह सहा संशयित दहशतवादी कारागृहातून पळून गेले होते. त्याचा शोध घेतला असता त्यापैकी अबू फैसल व त्याचे अन्य दोघे साथीदार सापडले. त्यांना मदत करणा-या व आश्रय देणा-यांचा तपास केला असता त्यात सोलापूरच्या म. सादिक लुंजे या तरुणाचे नाव पुढे आले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. सादिकचा लॅपटॉपही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.