28 February 2021

News Flash

तरुणाच्या ध्यासातून गावाला शुद्ध पेयजल

‘केल्याने होत आहे’ हा मंत्र संगणक युगातही मनात सामाजिक बांधिलकीची भावना जागवतो. आयरेदय महाजन या तरुणाने स्वखर्चाने उस्मानाबाद जिल्हय़ातील कनगरा येथील गावकऱ्यांना पिण्याचे शुद्ध

| June 12, 2013 01:59 am

‘केल्याने होत आहे’ हा मंत्र संगणक युगातही मनात सामाजिक बांधिलकीची कृतिशील भावना जागवतो. ती प्रमाण मानून आयरेदय महाजन या तरुणाने स्वखर्चाने उस्मानाबाद जिल्हय़ातील कनगरा येथील गावकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले. अशाप्रकारे पाणी उपलब्ध झालेले कनगरा हे राज्यातील पहिलेच गाव आहे. या उपक्रमाचे सर्वानीच कौतुक केले.
मूळ नांदेडचा असलेला आयरेदय महाजन हा लातूरच्या केशवराज विद्यालयाचा विद्यार्थी. बी. एस्सी., एमबीएचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईत जापनीज बँकेत सहव्यवस्थापक पदावर रुजू झाला. वाचनाची लहानपणापासून आवड. जगभरात ७० टक्के आजार पिण्याचे शुद्ध पाणी न मिळाल्यामुळे होतात. जगातील १५० देशांमध्ये मानव विकास निर्देशांकात भारताचा क्रमांक १३६ वा आहे. हे चित्र पाहता भारत महासत्ता कसा बनेल, हा प्रश्न आयरेदयला पडला. जमेल तसे सामाजिक काम केले पाहिजे, ही ऊर्मी त्याच्या मनात जागी झाली. एखाद्या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला पाहिजे हा ध्यास त्याने घेतला व गुजरातमध्ये जाऊन शुद्ध पाणी कमी खर्चात कसे उपलब्ध केले जाते, याचे तंत्रज्ञान समजून घेतले. ज्या गावात पाणी उपलब्ध करून द्यायचे त्या गावची ती खरी गरज असली पाहिजे, याचे महत्त्व त्याने ओळखले.
उस्मानाबाद जिल्हय़ातील कनगरा गावचा प्रसाद इंगळे आयरेदयला भेटला व गप्पाच्या ओघात गावातील पाण्याची समस्या सांगितली. गावात केवळ एक आड आहे. या आडात टँकरने पाणी टाकले जाते व हे पाणी गावकऱ्यांना प्यावयास वापरावे लागते. हे ऐकल्यावर आयरेदयने थेट कनगरा गाव गाठले. गावातील सरपंचासह काहींना भेटून गावकऱ्यांसाठी शहरात बिसलरीचे दिले जाते तसे शुद्ध पाणी उपलब्ध करून देईन. त्याचा खर्च मी करेन. मात्र, देखभाल खर्च गावकऱ्यांनी केला पाहिजे. पिण्याच्या पाण्यासाठीच्या खर्चात किमान काही वाटा प्रत्येकाने उचललाच पाहिजे. फुकट पाणी कोणालाही देऊ नये, असे पटवून दिले. सरपंच व ग्रामस्थांना ही कल्पना पटली. आडातील पाणी एका टाकीत घेऊन टाकीत शुद्धीकरण यंत्र बसवले. यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च आयरेदयने स्वत: केला.
शुद्ध पाणी उपलब्धतेचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडला. नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर, नाबार्डचे सेवानिवृत्त उपमहाव्यवस्थापक एस. आर. डेरे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे उस्मानाबादचे प्रमुख नितीन भोसले या वेळी उपस्थित होते. या सर्वानी आयरेदयच्या कामाचे कौतुक केले. देखभाल दुरुस्तीचा खर्च करण्याच्या निर्णयाबद्दल गावकऱ्यांचेही कौतुक केले. अशा प्रकारे शुद्ध पाणी उपलब्ध करणारे कनगरा हे राज्यातील पहिले गाव म्हणून नोंद होईल, असे ठोंबरे यांनी या प्रसंगी सांगितले. राज्यातील इतरही अनेक गावांत असा प्रकल्प सुरू करता येईल. त्यासाठी विविध मंडळींनी पुढाकार घेतला पाहिजे. पाणी शुद्धीकरणाचे अद्ययावत तंत्र उपलब्ध आहे व त्यासाठी अतिशय कमी खर्च लागतो. सर्वानी मिळून गाव सुधारण्याची इच्छाशक्ती दाखवल्यास गावात बदल होऊ शकतो, असे देऊळगावकर यांनी सांगितले.

कार्ड रिचार्ज केल्यावर मिळते पाणी
कनगरा गावकऱ्यांना पाणी घेण्यासाठी ‘एटीएम’ प्रमाणे प्रत्येकास कार्ड दिले गेले. हे कार्ड रिचार्ज केल्यानंतरच पाणी उपलब्ध होते. ३ रुपयांना १५ लिटर पाणी उपलब्ध होते. रिचार्ज करण्याची व्यवस्था गावातच आहे. बसवाहकाकडे असते तसेच हे छोटेखानी यंत्र आहे. गेल्या महिन्यापासून गावकरी हे पाणी वापरत आहेत. प्रारंभी महिन्याचा देखभाल खर्च ग्रामपंचायतीने केला. आता लोक स्वत: खर्च करीत आहेत. गावातील काही मंडळीच या पाण्याचा वापर करीत असल्यामुळे ३ रुपयाला १५ लिटर पाणी दिले जाते. पाण्याचा वापर वाढल्यास हा खर्च एक रुपयाने कमी होईल व दोन रुपयांना १५ लिटर शुद्ध पाणी देता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2013 1:59 am

Web Title: young mans yearning give pure water to village
Next Stories
1 धस यांचे मंत्रिपद लोकसभेसाठीच!
2 ‘पालकत्वा’ च्या कसरतीत सोळंकेंनी गमावला ‘लाल दिवा’!
3 निराधार झालेल्या मुलांना अनेकांकडून मदतीचा हात
Just Now!
X