जायकवाडीचे हक्काचे पाणी मिळाले नाही, तर मराठवाडय़ातील शेतीचे वाळवंट होईल. त्यामुळे हक्काच्या पाण्याची लढाई तरुणांनी हाती घ्यावी, असे आवाहन अॅड. प्रदीप देशमुख यांनी केले.
जायकवाडी कृती संघर्ष समितीच्या वतीने महाविद्यालयातील तरुणांना पाणी हक्काची जाणीव करून देता यावी म्हणून कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. गुरुवारी विवेकानंद महाविद्यालयात ते बोलत होते. नगर व नाशिक जिल्हय़ांत होणाऱ्या वेगवेगळय़ा आंदोलनांच्या पाश्र्वभूमीवर मराठवाडय़ात जागृती करता यावी, पाण्याचा प्रश्न तरुणांना समजावा, यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या जात आहेत. उद्या (शुक्रवारी) देवगिरी महाविद्यालयात या विषयावर व्याख्यान होणार आहे.
पाणी हक्काच्या लढाईचे नेतृत्व विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीनिमित्त युवकांनी हातात घ्यावे, असे आवाहन अॅड. देशमुख यांनी केले. गेल्या सात वर्षांपासून जायकवाडीच्या लाभक्षेत्रातील १ लाख ८७ हजार एकर क्षेत्र पाण्यापासून वंचित आहे. पाणी न मिळाल्याने मराठवाडय़ाचा विकास खुंटणार असून येथील बेकारी वाढेल. त्यामुळे पाण्यासाठी आता युवकांनीच रस्त्यावर उतरायला हवे, असे आवाहन करण्यात आले. औरंगाबाद शहरातील महाविद्यालय व जिल्हय़ात तरुणांमध्ये पाणी जागृतीसाठी कार्यक्रम हाती घेतले जाणार असल्याची माहिती समितीचे जयाजीराव सूर्यवंशी यांनी दिली. वरील धरणांच्या कालव्यांतून पाणी वळविले नसते तर जायकवाडी ८० टक्के भरले असते, असा दावाही या वेळी करण्यात आला.