फ्रेन्डशीप, व्हॅलेनटाइन डे तसेच ३१ डिसेंबरची रात्र मोठय़ा जोशात साजरे करणारे तरुण-तरुणी दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे जिल्ह्य़ाच्या विविध भागांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेत अग्रभागी असणार आहेत. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्य़ात आयोजित वेगवेगळ्या स्वागतयात्रांमधून दुष्काळ ग्रस्तांसाठी निधी संकलन करण्यात येणार आहे. यासाठी युवक, युवतींच्या मंडळांनी विशेष पुढाकार घेतला असून यामुळे नववर्षांच्या स्वागतयात्रांमध्ये तरुणाईचा वेगळा जोश पाहावयास मिळणार आहे.
डोंबिवली येथील गणेश मंदिर संस्थानच्या वतीने १५ वर्षांपूर्वी नववर्ष स्वागतयात्रेची संकल्पना रुजू करण्यात आली. यानंतर चांगले ते घ्यायचे या तत्त्वानुसार मुंबईसह, ठाणे जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ या शहरांमध्येही स्वागतयात्रा सुरू करण्यात आल्या. यामुळे आता गुढीपाडवा हा सण राहिला नसून त्याला एका उत्सवाचे स्वरूप आले आहे. यात्रेच्या निमित्ताने शहराच्या विविध भागांत रांगोळ्या काढण्यात येतात. यामुळे संस्कृतीबरोबर कलेचेही दर्शन घडून येते. तसेच यात्रेच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये दीपोत्सव, आकाशात दिवे सोडणे यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी राज्यावर पडलेली दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता सर्व शहरातील स्वागतयात्रा आयोजकांनी दुष्काळग्रस्तांसाठी निधी संकलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आयोजकांनी नियोजित खर्चात कपात करून शिल्लक रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी राखून ठेवली आहे. तसेच यात्रेदरम्यान यात्रा आयोजन करणाऱ्या संस्थेचे कार्यकर्ते निधी संकलन करताना दिसतील. जिल्ह्य़ातील अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली आणि ठाणे येथील स्वागतयात्रांमध्ये निधी संकलन केले जाणार आहे. यामुळे तरुणांनी सामाजिक भान जपणे आवश्यक असल्याचे लक्षात ठेवून शक्य तेवढी मदत स्वागतयात्रेच्या माध्यमातून करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला आहे.