राज्यात युवक काँग्रेसचे कौतुकास्पद कामकाज सुरू असून, कराड उत्तर भागातही काँग्रेस बळकटीकरणासाठी युवक काँग्रेसची फळी उभी करू तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांत युवक काँग्रेसचा सहभाग महत्त्वपूर्ण राहणार असल्याचा विश्वास युवक काँगेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.
उंब्रज (ता. कराड) येथे कराड उत्तर युवक काँग्रेसतर्फे आयोजित युवक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील अध्यक्षस्थानी होते. धर्यशील कदम, अविनाश नलवडे, शिवराज मोरे, भीमराव पाटील, मारुतीशेठ जाधव, जयंत जाधव, विकास जाधव, इंद्रजित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी उंब्रज व परिसरातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीची पत्रे देण्यात आली.
विश्वजित कदम म्हणाले, की सातारा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी युवक काँग्रेसला समान वागणूक मिळवून दिली. राहुल गांधींच्या विचारातून गावागावातील युवक कार्यकर्त्यांना पक्षाचे दरवाजे खुले झाले आहेत. केंद्रात व राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. लोकांना त्रास होईल अशी आंदोलने आम्ही करत नाही. कराड उत्तर विभागाला युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांची मजबूत ताकद देऊ.
आनंदाराव पाटील म्हणाले, की मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात कोटय़वधींची कामे सुरू आहेत. ते राज्याचे नेतृत्व करीत असले, तरी जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे नेहमीच लक्ष असते. मात्र, कराड उत्तरेतील काही नेते खोटय़ा वल्गना करून दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटण्याचे काम करीत आहेत. सातारा जिल्ह्यातील काँग्रेस हे कदापि सहन करणार नाही. कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, विमानतळ, एमआयडीसी, भूकंप संशोधन केंद्र असे मोठे प्रकल्प तालुक्यात येत असताना विरोधक खो घालत आहेत. उंब्रज, मसूरला नगरपंचायतीचा दर्जा, स्वतंत्र तालुका करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू.
प्रास्ताविक इंद्रजित जाधव यांनी केले. धर्यशील कदम, शिवराज मोरे, अविनाश नलवडे, भीमराव पाटील, राहुल घाडगे, अमित जाधव, जयंत जाधव यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. कराड उत्तर मतदारसंघातील युवक कार्यकर्ते मेळाव्याला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.