कुटुंब जसे वाढते तशा घराच्या भिंतीही विस्तारतात. पण, गेल्या पाच-सहा वर्षांत जवळपास दुपटीहून विस्तारलेल्या युवा महोत्सवांच्या आवाक्याची दखल अद्यापही विद्यापीठाने घेतलेली नाही.
चर्चगेटच्या ‘बी’ रोडवरील दोन मजली ‘विद्यार्थी विद्यापीठ भवना’त हा महोत्सव भरविला जातो. क्लब हाऊस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या इमारतीत विद्यार्थी कल्याण विभागासह संगीत विभाग, लोककला अकादमी आदी विद्यापीठाचे विभागही कार्यरत आहेत. युवा महोत्सवाचे विस्तारलेले स्वरूप पाहता ही इमारत आता अपुरी पडू लागली आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी केवळ ८० ते १२० महाविद्यालयांमधील तरुणाई युवा महोत्सवात आयोजिणाऱ्या विविध स्पर्धामध्ये भाग घेत असे. पण, गेल्या काही वर्षांत सहभागी महाविद्यालयांची संख्या वाढत गेली. या वर्षी तब्बल २३० महाविद्यालये युवा महोत्सवात सहभागी झाली होती. स्पर्धेच्या निमित्ताने एकावेळी या ठिकाणी ५०० ते ६०० विद्यार्थी हजर असतात. याशिवाय ज्या ठिकाणी २०० विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या स्पर्धेच्या सरावाच्या निमित्ताने ‘पडीक’ असत. आता त्या ठिकाणी तब्बल ५०० विद्यार्थी राहतात. त्यामुळे अर्थातच ही जागा अपुरी पडू लागली आहे. युवा महोत्सवात आतापर्यंत कला, विज्ञान वाणिज्य शाखेचे विद्यार्थीच सहभागी होत. पण, आता फाईन आर्ट, अभियांत्रिकी शाखांचे विद्यार्थीही उत्साहाने युवा महोत्सवात सहभागी होऊ लागले आहेत. सध्या हिंदी-मराठी नाटय़-चित्रपटसृष्टीत स्थिरावलेले अनेक कलाकार युवा महोत्सवात तावूनसुलाखून निघाले होते. त्यामुळे, कला, सांस्कृतिक क्षेत्रात काहितरी करू इच्छिणाऱ्यांसाठी युवा महोत्सव हे व्यासपीठ ठरते. विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे महोत्सवातील बक्षीसांची संख्याही वाढविण्यात आली. पण, त्या तुलनेत क्लब हाऊसचा पसारा न वाढल्याने आता इथली जागा अपुरी पडू लागली आहे, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्यांने व्यक्त केली.
ज्या स्पर्धा मोठय़ा स्तरावर होतात त्या अन्यत्र घेता येणे शक्य आहे. पण, आम्हाला सरावाच्या दृष्टीने ही जागा सोईची आहे, अशी पुष्टीही या विद्यार्थ्यांने जोडली.
लवकरच जागा होईल
क्लब हाऊसमधील काही विभाग कलिना संकुलात बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक इमारतीत हलविली जाणार आहेत. त्यामुळे, आम्हाला लवकरच अधिकची जागा उपलब्ध होईल. –
मृदुल निळे, संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग
क्रीडा संकुलात जागा द्या
विद्यापीठाकडे जागा नाही असा प्रकार नाही. कालिना येथील क्रिडा संकुलात तर भव्य प्रमाणात युवा महोत्सवातील स्पर्धाचे आयोजन करता येऊ शकेल. परंतु, विद्यापीठाला हे संकुल आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात रस नाही. उलट बाहेरच्या संस्थांच्या उपक्रमांना येथे लगेचच जागा दिली जाते. –
प्रदीप सावंत, सदस्य, विद्यापीठ अधिसभा