News Flash

युवक महोत्सवात विद्यापीठाचा दबदबा

स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करण्याचे युवक महोत्सव हे उत्तम व्यासपीठ असते. जिद्द, चिकाटीच्या बळावर झटून प्रयत्न केल्यास यश तुमचेच असते, असा कानमंत्र राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

| November 21, 2013 01:54 am

युवक महोत्सवात विद्यापीठाचा दबदबा

तरुणाईचा उत्साह आणि जल्लोषाची पर्वणी ठरलेल्या केंद्रीय युवक महोत्सवात सलग पाचव्या वर्षी विद्यापीठाचा संघ सवरेत्कृष्ट ठरला.
स्पर्धेत एकूण २० पारितोषिकांची कमाई करीत विद्यापीठाने आपला दबदबा राखला. स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करण्याचे युवक महोत्सव हे उत्तम व्यासपीठ असते. जिद्द, चिकाटीच्या बळावर झटून प्रयत्न केल्यास यश तुमचेच असते, असा कानमंत्र राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री उषा जाधव यांनी या वेळी तरुणाईला दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली केंद्रीय युवक महोत्सवाची धूम बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपली. अभिनेत्री उषा जाधव यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. स्पर्धेत उत्कृष्ट ग्रामीण संघ म्हणून कन्नडच्या शिवाजी महाविद्यालयाची निवड झाली. या महाविद्यालयाने सात कलाप्रकारांमध्ये आपला ठसा उमटवला.
सोनेरी महालाजवळील रंगमंचावर कुलुगरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या अध्यक्षतेखाली महोत्सवाचा समारोप झाला. कुलसचिव डॉ. धनराज माने, डॉ. नीता पांढरीपांडे, डॉ. अशोक मोहेकर, डॉ. मेहेर पाथ्रीकर, डॉ. वसंत सानप, डॉ. भारत हंडीबाग, डॉ. सुरेशचंद्र झांबरे, डॉ. शिवाजी सांगळे, प्रा. संभाजी भोसले, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, प्रा. गजानन सानप उपस्थित होते.
अभिनेत्री उषा जाधव म्हणाल्या की, आयुष्यात संघर्षांचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो. कलाक्षेत्रात यायचे असेल तर अंगी जिद्द, चिकाटी हवी. यश नक्कीच मिळेल. चित्रपटात मुख्य भूमिका मिळविण्यास मला सात वर्षे लागली. कोणत्याही क्षेत्रात जायचे असेल, तर त्या क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी करून दाखवा. आपल्याप्रमाणेच मीदेखील एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आली आहे. जिद्द, मेहनत व चिकाटीच्या बळावर राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्रीपदापर्यंत पोहोचले. कोल्हापूर, पुणे, मुंबई ते दिल्ली हा स्वप्नवत प्रवास सोपा नक्कीच नव्हता. पण मी हे प्रयत्नपूर्वक साध्य करून दाखवले. विद्यापीठाचा परिसर अत्यंत सुंदर असून मी या परिसराच्या प्रेमातच पडले, असेही त्या म्हणाल्या.
विद्यापीठाला नॅकचे ‘अ’ दर्जाचे मानांकन मिळाल्याचा आनंद साजरा करणे म्हणजे हा केंद्रीय युवक महोत्सव असून, यापेक्षा मोठा आनंद काय असू शकेल, अशी भावना कुलगुरू डॉ. पांढरीपांडे यांनी व्यक्त केली.
महोत्सवात विजयी विविध कलाप्रकारात विजयी ठरलेले संघ पुढीलप्रमाणे :  उत्कृष्ट संघ : संगीत गट – शिवाजी महाविद्यालय (कन्नड), नृत्य गट – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ, नाटय़ गट – देवगिरी महाविद्यालय, ललित कला – शासकीय कला महाविद्यालय, महाराष्ट्राची लोककला – शिवाजी महाविद्यालय, उत्कृष्ट ग्रामीण संघ – शिवाजी महाविद्यालय, उत्कृष्ट संघ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.
महोत्सवात विद्यापीठ संघाने एकूण २० पारितोषिके पटकावली. लोक आदिवासी नृत्य, क्रिएटिव्ह नृत्य, उत्कृष्ट अभिनय (पुरुष), कोलाज, इन्स्टॉलेशन, पोवाडा, भजन, प्रहसन, समूह गायन, स्पॉट फोटोग्राफी, वादविवाद, उपशास्त्रीय व सुगम गायन, मूक अभिनय, व्यंगचित्रकला, प्रश्नमंजूषा, लोकनाटय़ तर नृत्य गटात उत्कृष्ट संघ ही ती पारितोषिके होत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2013 1:54 am

Web Title: youth festival good platform usha jadhav
Next Stories
1 व्हेरॉक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
2 प्रोटोकॉल बुकेचा मराठवाडय़ातही विस्तार
3 अधिकार नसताना गुंठेवारी करणारे माजलगावचे दोन कर्मचारी निलंबित
Just Now!
X