काही वर्षांपासून नवरात्रौत्सव आणि दांडिया तर काही ठिकाणी गरबा असे समीकरण रूढ होत चालले आहे. यादृष्टीने विविध मंडळांकडून सुरू असलेले नियोजन अंतिम टप्प्यात आहे. तरुणाईची कुठल्या गटासमवेत कोणत्या लॉन्सवर खेळायचे, सेलिब्रेटी कुठे येणार याची चाचपणी सुरू आहे. गरबा किंवा दांडियाच्या ठेक्यावर ताल धरता नाही आला तरी या माहोलमध्ये हटके दिसण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यंदाच्या गरबा पोषाखावर रामलीला तसेच चेन्नई एक्स्प्रेसची छाप असून युवा वर्गाकडून त्यास विशेष मागणी आहे. ‘दांडिया सेलिब्रेशन’चे लोण अगदी शाळेतील शिशुविहापर्यंत पोहचले आहे. पण, या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी पालकांसह युवा वर्गाला चांगलाच आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे.
गणेशोत्सवाची धामधूम संपली की तरुणाईला वेध लागतात ते डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या पावलांचे किंवा गुजराथी वा राजस्थानी गीतांवरील ठेक्याचे. अगदी गल्लीपासून शहरातील मध्यवर्ती मैदानावर नवरात्रौत्सव काळात दांडिया अथवा गरब्याचे आयोजन केले जाते. तरुणाईची अभिरुची जपण्यासाठी सामाजिक कला मंडळाकडून खास गरबा वा दांडियाचे आयोजन करण्यात येते. यंदा या महोत्सवाला विधानसभा निवडणुकीची किनार लाभल्याने तरुणाईचा तसेच कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. ‘होऊ दे खर्च..’ या बाजारात हा उत्सव साजरा करावा लागेल असे नियोजन आहे. तरुणाईने या माहोलचा आस्वाद आपल्या पद्धतीने घेण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. यासाठी कुठल्या लॉन्सवर, तिकिटे कशी मिळवता येतील, तिथे तारक-तारकांची हजेरी राहील का? त्यासोबत आपला ‘सेल्फी’ काढता येईल का, अशा अनेक विषयांवर मंथन सुरू आहे. काहींनी ठेक्यावर सहज ताल धरता यावा यासाठी गरबा तसेच दांडियाच्या कार्यशाळा पूर्ण केल्या आहेत. म्हणजे ताल धरण्यासाठी इच्छुकांनी हजारो रुपयांचे शुल्क आधीच मोजले आहे.
पेहेरावावरही विशेष लक्ष केंद्रित करत तरुणाईने विद्युत रोषणाईत झगमगीत कपडय़ांना प्राधान्य दिले आहे. यंदाच्या दांडिया पोशाखावर चेन्नई एक्स्प्रेस तसेच रामलीलाची विशेष छाप आहे. याशिवाय टीव्हीवरील मालिकांमध्ये वापरण्यात आलेल्या घागरा-चोलीची काहींनी डिझाइन देत तसा पोशाख तयार करून घेतला आहे. पोशाखासारखीच भरगच्च दागिन्यांनाही मागणी आहे. हे सर्व पोषाख भाडेतत्त्वावर साधारणत: २५० पासून ५५० रुपयांपर्यंत दागिन्यांसह उपलब्ध आहेत. मुलींसाठी घागरा, चोली हा पारंपरिक पोषाख असला, तरी युवतींमध्ये ‘मिस मॅच’ची क्रेझ आहे. पारंपरिक घागरा चोली न वापरता फिक्या किंवा गर्द रंगाच्या जीन्सवर नक्षीकाम असलेली चोली, कमरेला ओढणी बांधत संपूर्ण दागदागिने घालण्याची पद्धत काहींनी अनुसरली आहे. डोक्यावर खास टोपसारखा असलेला ‘टोप्या’ चढविल्याने हा पोशाख अधिकच खुलून दिसतो. मुलांना मात्र काठियावाड किंवा केडियावरच समाधान मानावे लागत आहे. केडियामध्ये काही प्रकार आले असले, तरी त्यात फारसे नावीन्य नसल्याचे  ‘कला’ दि डिझाइनर्सच्या वृषाली माहेगांवकर यांनी सांगितले. तरुणाईचे गरबाप्रेम शाळांमध्ये पोहोचले असून, शहर परिसरातील अनेक विद्यालयांमध्ये ‘दांडिया सेलिब्रेशनची’ धूम आहे. बालगोपाळ पारंपरिक वेश धारण करून ठेक्यावर ताल धरत हा सण साजरा करणार आहेत.