वातावरणात उबदार थंडी जाणवायला लागली की, लगेचच प्रत्येकाला आजी किंवा आईच्या हातच्या विणलेल्या स्वेटर्सची आठवण व्हायची. हिवाळ्याच्या आगमनासोबतच बाजारपेठासुद्धा स्वेटरमय होऊन जायच्या. पण सध्या या स्वेटर्सपेक्षा मुंबईकर तरुणाईला विविध रंगी जॅकेट्स, श्रग्स भुरळ घालू लागले आहेत. यंदा बाजारपेठाही जॅकेट्सनी फुलून गेल्या आहेत.
पूर्वी हिवाळ्याच्या साधारण दोन-तीन महिने आधीपासूनच आजी किंवा आई घरातल्यांसाठी स्वेटर विणायला घेत असत. त्यामुळे स्वत: आपल्या पसंतीच्या रंगाचे लोकरीचे धागे निवडणे, पसंतीची डिझाइन निवडण्यासाठी ताईसोबत हुज्जत घालणे असे प्रकार घराघरातून पाहायला मिळत असत. पण काळाप्रमाणे घरात विणलेल्या स्वेटर्सची जागा बाजारातील आकर्षक रंगाच्या आणि प्रिंट्सच्या स्वेर्ट्सनी घेतली. पण मुंबईमध्ये फारतर दोन ते तीन महिने थंडी असते, त्यातही स्वेटर घालून फिरावे लागेल असे वातावरण आठवडय़ातून एकदाच असते. त्यामुळे केवळ या दोन-तीन महिन्यांसाठी स्वेटर्सवर खर्च करण्यापेक्षा विविध रंगी जॅकेट्स घेण्याकडे तरुणांचा कल आहे. बाजारामध्ये जॅकेट्सचे विविध प्रकार म्हणजेच श्रग्स, कॅज्युअल ब्लेझर्स, ओव्हरकोट्स, कार्डियन्समध्ये खूप विविधता पाहायला मिळत आहे. यांची खासियत म्हणजे वूलनसारख्या जाडय़ा कापडांऐवजी यामध्ये डेनिम, जर्सी, जॉजेट, कॉटन अशा कमी वजनाच्या कापडांचा वापर होतो. त्यामुळे हिवाळ्याशिवाय इतर दिवसांमध्येही हे घालता येतात. त्यामुळे स्वेटरप्रमाणे वर्षभर कपाटामध्ये पडून राहत नाहीत. तसेच उजळ रंग, विविध प्रिंट्स यामुळे हे जॅकेट्स दिसायलाही सुंदर दिसतात. मुलांसाठीसुद्धा डेनिम किंवा (आर्टिफिशिअल) बनावटी चामडय़ाचे जॅकेट्स बाजारात उपलब्ध आहेत. बाईकर जॅकेट्ससुद्धा सध्या मुलांमध्ये लोकप्रिय आहेत. स्ट्रिट मार्केटमध्ये साधारणपणे स्वेटर्सची किंमत ३०० रुपयांपासून सुरू होऊन ७०० रुपयांपर्यंत जाते. पण तिथेच श्रग्ससारखे प्रकार मात्र १०० रुपयांपासून सहज उपलब्ध असतात. ब्रॅण्डेड दुकानांमध्ये यांची किंमत हजाराच्या घरातही जाते. तसेच फॉर्मल ते पार्टीवेअर अशा विविध लुक्ससोबत ते जुळून येतात.
 स्वेटर्सचा लुक तरुणांना जुना वाटतो. त्याऐवजी जॅकेट्समुळे त्यांना स्टायलिश लुक मिळतो. ऑफिस किंवा पार्टीमध्ये स्वेटरमुळे येणारा ‘गावठी’ लुक जॅकेट्समध्ये दिसत नाही. त्यामुळे फॅशन म्हणूनही हे जॅकेट्स सहज मिरवता येतात, असे दादरमधील एका जॅकेटविक्रेत्या दुकानदाराने सांगितले. त्यांच्याकडे श्रग, कार्डियन्स, डेनिम जॅकेट्स अशा जॅकेट्सच्या प्रकारांना वर्षभर मागणी असल्याचे ते सांगतात.

बाजारातील जॅकेट्सच्या किमती
श्रग्स –  १०० ते ५०० रुपये
कार्डियन्स – ३०० ते ७०० रुपये
ब्लेझर्स –  ५०० ते १,५०० रुपये
ओव्हरकोट्स – ७,०० ते २,००० रुपये
डेनिम जॅकेट्स – २५० ते ५०० रुपये
आर्टिफिशिअल लेदर जॅकेट्स – ५०० रुपयांपासून सुरू.