रस्त्यावरील होणारे सर्वाधिक अपघात हे मानवी चुकांमुळे होतात. अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम हा आपल्या दैनंदिन सवयीचा अविभाज्य भाग व्हावा, यासाठी युवकांनी अपघात टाळण्यासाठी जनजागृती मोहिमेत पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत राज्य स्तरावर राबविण्यात आलेल्या आंतरविद्यापीठ रस्ता सुरक्षा पुरस्काराचा वितरण समारंभ डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ऊर्जा राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलीस आयुक्त के.के. पाठक, वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुरेंद्र पांडे, आमदार डॉ. मिलिंद माने यांच्यासह विद्यापीठांचे कुलगुरू व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. रस्त्यावरील अपघातामध्ये सरासरी ७५ टक्के अपघात मानवी चुकांमुळे होतात. अपघातात जीवित हानी अथवा अपंगत्व आल्यामुळे संपूर्ण परिवाराला या दुर्देवी घटनेबद्दल होणारा त्रास टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा संबंधी घ्यावयाच्या खबरदारीबद्दल समाजामध्ये मोठय़ा प्रमाणात जागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे. अपघात झाल्याबरोबरच तातडीने मदत देण्याऐवजी बघ्याची भूमिका न घेता आपले कर्तव्य समजून अपघातग्रस्तांना संपूर्ण मदत करावी, असेही मुख्यमंत्री याप्रसंगी म्हणाले.
प्रारंभी राज्यातील १४ विद्यापीठाच्या सुमारे तीन हजार महाविद्यालयातील ५ लाख विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा अभियानामध्ये सहभागी होऊन विविध उपक्रम राबवले. यामध्ये विद्यापीठ स्तरावर प्रथम आलेल्या भारती विद्यापीठाला ५ लाख रुपये, फिरते चषक व स्मृतिचिन्ह, द्वितीय पुरस्कार पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाला एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व तृतीय पुरस्कार नांदेड येथील रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला ७५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला यावेळी विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
सुरुवातीला अप्पर पोलीस महासंचालक सुरेंद्र पांडे यांनी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत राज्यस्तरावर राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. राज्यात १८ ते ३० वयोगटातील वाहनचालकांमध्ये अपघाताचे प्रमाण सर्वाधिक असून अपघात झाल्याबरोबर पहिल्या काही तासात मदत मिळण्यासाठी राज्यातील २३ प्रमुख महामार्गावर ६३ महामार्ग पोलीस केंद्र कार्यान्वित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. संचालन रेणुका देशकर यांनी केले तर बाळासाहेब पाटील यांनी आभार मानले.