देशाचे नेतृत्व निश्चित करणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत तरुणांनी सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी अभिषेक  कृष्णा यांनी गुरुवारी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना, एल.ए.डी.आणि श्रीमती आर.पी. कॉलेज फॉर वुमेन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मतदार जनजागृती अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.
येत्या ९ मार्चला जिल्ह्य़ात मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. ज्या तरुणांनी नाव मतदार यादीत अद्याप नोंदले नाही त्यांनी आपले नाव नजीकच्या मतदान केंद्रात ९ मार्चला जाऊन नोंदवून घ्यावे व इतरांनाही नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे. भारतीय संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा हक्क आहे तसेच ते कर्तव्यही आहे. या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होऊन भारतीय लोकशाही निकोप व सुदृढ करण्यासाठी सहकार्य करावे. समाजाचे सामाजिक स्वास्थ्य कायम राखण्यासाठी तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मनोरंजनासोबतच देश उभारणीसाठीही करावा, असेही अभिषेक कृष्णा म्हणाले.   राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी भाषणात ज्या देशातील युवक सुज्ञ आहेत त्या देशाचा विकास जलद गतीने होतो. आपण जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही देशाचे नागरिक आहोत. ही लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत भाग घेणे आवश्यक आहे. मतदारांनी मतदानाच्या अधिकाराचा वापर करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे तसेच इतरांनाही मतदानासाठी प्रवृत्त करावे, असे सांगितले. यावेळी उपनिवडणूक अधिकारी प्रदीप कुमार डांगे, प्राचार्या डॉ. श्यामला नायर, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. भाऊ दायदार उपस्थित होते. प्रारंभी चित्रा मोडक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. माधवी दातारकर यांनी आभार मानले.