चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १७ लाख १५ हजार २५४ मतदारांची अद्यावत यादी तयार करण्यात आली आहे. पाच वर्षांत तब्बल १ लाख ७९ हजार ७६५ मतदारांची वाढ झालेली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत युवक, विद्यार्थी, महिला व मजूर मतदारांची नोंदणी कमी झाल्याने मतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आजच नाव नोंदणी करावी, मतदार यादीत नाव असल्याशिवाय मतदान करू दिले जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकसभा-२०१४ च्या निवडणुकीची तयारीला जिल्हा प्रशासनाने सुरुवात केलेली आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, आर्णी व वणी विधानसभेचा समावेश आहे. त्यानुसार २०१४ सार्वत्रिक निवडणुकीसाठी १७ लाख १५ हजार २५४ मतदारांची संगणकीय यादी तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये ९ लाख २ हजार ८२६ पुरूष तर ८ लाख १२ हजार ४२८ महिला मतदारांचा समावेश आहे. यात सेनादलातील १ हजार ६८ मतदार आहेत. त्यात ८१३ पुरूष व २५५ महिला मतदार आहेत. यात सर्वाधिक २ लाख ९४ हजार ६७० मतदार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात आहेत. त्या पाठोपाठ राजुरा विधानसभा मतदारसंघात  २ लाख ८४ हजार ३४८, आर्णी विधानसभा २ लाख ७१ हजार ८६७, तर वरोरा विधानसभा २ लाख ६८ हजार ३६९, वणी विधानसभा २ लाख ५७ हजार १०८ तर सर्वात कमी चंद्रपूर विधानसभा २ लाख २८ हजार ८९२ मतदार आहेत. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत १५ लाख ३५ हजार ४८९ मतदार होते. २०१४ च्या निवडणुकीसाठी मतदारांचा आकडा हा १७ लाखांच्या वर पोहोचला असून पाच वर्षांत तब्बल १ लाख ७९ हजार ७६५ मतदारांची वाढ झाली आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत महिला, युवक, विद्यार्थी व मजुरांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी वाढली आहे. एखाद्याकडे मतदान ओळखपत्र असेल परंतु मतदार यादीत नाव नसेल तर त्याला मतदार करू दिले जाणार नाही. त्यामुळे पहिले मतदार यादीत नाव नोंदणी करा, असे असेही ते म्हणाले.
१८ ते २० वष्रे वयोगटात यावर्षी ४३ हजार ९९२ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. या जिल्हय़ातील युवकांची संख्या बघता ४८ हजाराच्या वर नोंदणी अपेक्षीत होती. त्या तुलनेत महिला व युवकांची २० ते २२ हजाराने नोंदणी कमी झालेली आहे. त्यामुळे आताही जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार नाव नोंदणी करू शकतात.  गेल्या वर्षी केवळ ५८.४५ टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, प्राचार्य यांच्याकडून संकल्प पत्र भरून घेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच प्रत्येक प्राचार्याकडून महाविद्यालयातील एक किंवा दोन विद्यार्थ्यांना कॅम्पस अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यासाठी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
मतदार यादीच्या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या वेळी मतदार यादीतील मृत, स्थलांतरित व दुबार नावे असलेल्या ११ हजार २६७ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. या जिल्हय़ात एक हजार पुरुषांमागे ९५९ स्त्रियांचे प्रमाण असले तरी मतदार यादीच्या नोंदीनुसार ९१५ इतके प्रमाण येत आहे. त्यामुळे आणखी ४० ते ४५ हजार महिला मतदारांनी नावांची नोंदणी केलेली नाही अशीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
या लोकसभा मतदारसंघासाठी मतदार केंद्राची संख्या १ हजार ९४९ आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ९४ ने वाढ झालेली आहे. तर यावर्षी निवडणुकीसाठी २ हजार ५८७ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र उपलब्ध आहेत. प्रत्यक्षात २ हजार १०८ यंत्रांचाच वापर होणार आहे. २८ मतदान यंत्र शिल्लक राहणार आहेत. लोकसभेत १५ उमेदवार रिंगणात असेल तर आणखी इलेक्ट्रॉनिक मशीन लागतील. अंतिम मतदार यादीनुसार छायाचित्र मतदार यादीचे काम ९१.९१ टक्के पूर्ण झालेले आहे. ज्या कुणाचे नाव मतदार यादीत नसेल त्यांनी नमूना ६ अर्ज भरून नाव दाखल करून घ्याव तसेच काही अडचण असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३४३३४ यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. पत्रकार परिषदेला उपजिल्हाधिकारी निवडणूक नान्हे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीची पेडन्यूज प्रकरणे हाताळण्यासाठी मीडिया सर्टीफिकेशन अ‍ॅन्ड मॉनिटरिंग समिती गठीत करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एखाद्या उमेदवाराची पेड न्यूजची तक्रार प्राप्त झाली तर ही समिती त्याच्यावर कारवाई करणार आहे. या समितीत जिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.