उद्धव आणि आदित्यला सांभाळा.. असे आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना करून दोन आठवडेही उलटत नाहीत तेवढय़ात युवा सेनेतील वाद चव्हाटय़ावर आले आहेत. आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी परस्परांवर केलेल्या कुरघोडय़ा आणि त्याचे मारामारीत झालेले रूपांतर यामुळे वाद विकोपाला गेला असून आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांमध्ये शिवसेना भवनाच्या परिसरातच बुधवारी रात्री हाणामारी झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. परळ भागात राहणारे बाळा कदम आणि वडाळ्यातील अमेय घोले हे दोघेही आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत. अमेय घोले  युवा सेनेचे कोषाध्यक्ष, तर बाळा कदम सुकाणू समितीचे सदस्य आहेत. बाळा कदम गेली अनेक वर्षे शिवसेनेत कार्यरत आहेत. तरूण वयात थेट कोषाध्यक्षपदापर्यंत पोहोचलेले अमेय घोले राजकारणात तसे नवखेच आहेत. त्यामुळे ‘कानामागून आला आणि तिखट झाला’ अशी त्यांच्याबद्दल अनेकांची भावना झाली आहे. युवा सेनेत आपले वर्चस्व टिकविण्यासाठी या दोघांमध्ये चढाओढ आहे. बुधवारी रात्री १० च्या सुमारास सेना भवन परिसरात हे दोघेही आमनेसामने आले आणि त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. मात्र या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेली नाही.
दरम्यान, अमेय घोले आणि बाळा कदम या दोघांनीही मोबाइलवर संपर्क साधला असता हाणामारी झाल्याचा इन्कार केला. मात्र युवा सेनेतील अन्य काही पदाधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर या वृत्ताला दुजोरा दिला.