शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, शेती, पर्यावरण, सामाजिक सेवा आणि शौर्य अशा विविध गटांत दिले जाणारे झी २४ तास अनन्य सन्मान पुरस्कारांचे यंदाचे सहावे वर्ष असून हा पुरस्कार सोहळा शनिवार, ११ जानेवारी रोजी होत आहे. यंदा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व त्यांच्या पत्नी निर्मलाताई पुरंदरे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार असून या वेळी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत. झी २४ तास आणि लोकसत्ता यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक वाट्टेल त्या थराला जाताना आज दिसतात. परंतु प्रसिद्धीपासून दूर राहून आपापल्या परीने विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी बजावणाऱ्या सामान्यांतील असामान्य लोकांसमोर आणावे, या दृष्टीने झी २४ तास अनन्य सन्मान पुरस्कार सुरू करण्यात आले.
लोकल गाडय़ांमध्ये प्रवास करून शाळा उभारणीसाठीसाठी निधी गोळा करणारे व्यक्तिमत्त्व असो की शरीरविक्रय करणाऱ्या शेकडो महिलांमध्ये शिक्षणाची ज्योत पेटविणारी महिला असो यांसारख्या व्यक्तींचा सन्मान या वेळी केला जाणार आहे. कबड्डीसारख्या खेळात लहान मुलांना प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर पताका फडकविणारे प्रशिक्षक, बॉम्ब निकामी करण्याच्या प्रयत्नात एक हात जायबंदी झालेले पोलीस कॉन्स्टेबल असोत, समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांत धैर्याने काम करणाऱ्या व्यक्तींना अनन्य सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.