27 November 2020

News Flash

मसाला मनोरंजन, पण..

हिंदी चित्रपटांमध्ये रिमेकचे प्रमाण खूप वाढले असले तरी सर्वसाधारणपणे मूळ चित्रपटच वरचढ ठरल्याचे आढळून आले आहे.

| September 7, 2013 09:54 am

हिंदी चित्रपटांमध्ये रिमेकचे प्रमाण खूप वाढले असले तरी सर्वसाधारणपणे मूळ चित्रपटच वरचढ ठरल्याचे आढळून आले आहे. नवा ‘जंजीर’ संवाद, संगीत, अभिनय याबाबतीत प्रकाश मेहरा दिग्दर्शित मूळ चित्रपटाच्या तुलनेत फिकाच ठरतो. पण आजच्या प्रेक्षकाला रुचेल अशा पद्धतीने मांडणी करून दिग्दर्शकाने एक मसालापट निर्माण केलाय. अर्थात मूळ चित्रपटाप्रमाणेच प्रमुख व्यक्तिरेखा आणि गाभा तोच असल्याने आजचा प्रेक्षकही तुलना करीतच चित्रपट पाहतो आणि खंतावतो हेही तितकेच खरे. मसाला मनोरंजन करणारा हा ‘जंजीर’ आहे, पण संवादांमध्ये फिका पडल्याने विशिष्ट परिणाम साधत नाही.
हा स्वतंत्र चित्रपट आहे, रिमेक नाही असे चित्रपटकर्त्यांनी म्हटले होते, पण ते खरे नाही हे सिनेमा पाहताना पटते. एसीपी विजय खन्ना आणि शेरखान यांच्यातील हाणामारी, मग होणारी त्यांची मैत्री असो की नायक विजय खन्ना आणि खलनायक रूद्र प्रताप तेजा यांच्यातील काही दृश्य असो मूळ ‘जंजीर’ची आठवण होतेच. नव्याने आजच्या काळातील विजय खन्ना, शेरखान, तेजा साकारताना आणखी चपखल, नेमक्या आणि खटकेबाज संवादांची गरज होती, ती मात्र चित्रपटात नाही. त्यामुळे मूळ चित्रपटाचे संवादच आठवत प्रेक्षक चित्रपट पाहतो. शेरखान आणि विजय खन्ना यांची पहिल्यांदा पोलीस ठाण्यात भेट होते. तेव्हाचा ‘ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही’ हा प्रेक्षकांना पाठ असलेला संवाद पुन्हा पाहायला-ऐकायला मिळतो तेव्हा प्रेक्षक सुखावतो. या चित्रपटाचे संगीत खूपच कमकुवत आहे. त्यामुळेही प्रेक्षक पुन्हा पुन्हा मूळ चित्रपटाशी तुलना करतो.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अमिताभची ‘अँग्री यंग मॅन’ प्रतिमा प्रस्थापित करणाऱ्या मूळ चित्रपटाची नक्कल दिग्दर्शकाने करावी का? हा मुद्दा उपस्थित होतो. अभिनेता चिरंजीवीचा मुलगा आणि तेलुगु सिनेमाचा सुपरस्टार राम चरण याने साकारलेली विजय खन्नाची प्रमुख व्यक्तिरेखा यांची नकळत तुलना करण्यात प्रेक्षक गुंततो. आयटम साँगसारखी गाणी चित्रपटात घुसडली आहेत. पटकथेशी त्याची सांगड घालण्यात लेखक-दिग्दर्शकाने गडबड केल्याने गाणी अस्थानी वाटतात.
अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर राम चरणने बॉलीवूड पदार्पणासाठी योग्य चित्रपटाची निवड केली असे म्हणावे लागेल. परंतु, अजित यांनी साकारलेला ‘तेजा’ आणि प्राण यांनी साकारलेला ‘शेरखान’ या दोन्हीची सर अनुक्रमे प्रकाश राज आणि संजय दत्त यांच्या अभिनयाला येऊच शकत नाही आणि प्रेक्षकांनाही ते चांगलेच ठाऊक आहे. रूबाबदार खलनायक, वैशिष्टय़पूर्ण लकबी दाखवून अजित यांनी अजरामर केलेला ‘तेजा’ ही व्यक्तिरेखाही खूप गाजली होती.
प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता ‘सिंघम’ चित्रपटामुळे गाजला असला तरी या चित्रपटात त्याने साकारलेला ‘तेजा’ अतिशय वाईट पद्धतीने समोर येतो. प्रियांका चोप्राने हा चित्रपट का स्वीकारला असा प्रश्न न पडला तरच नवल. आजच्या काळातील ‘माला’ दाखविताना दिग्दर्शकाने तिच्या अभिनयाला पटकथेत खूप वावच ठेवलेला नाही. अनेक मारधाड मसालापटांच्या रांगेत हा आणखी एक मसाला मारधाड मनोरंजनपट ठरतो. ‘क्लासिक’ मूळ चित्रपट सलीम-जावेद यांच्या संवादांमुळे कायमच वरचढ राहील यात शंका नाही.
या चित्रपटात ‘तेजा’ तेलमाफिया, तर ‘माला’ ही अनिवासी भारतीय दाखवली आहे. पटकथेत ‘माला’ ही व्यक्तिरेखा प्रस्थापित करण्यासाठी ती अनिवासी असली तरी हिंदी चित्रपटांचा तिच्यावरील प्रभाव खूप आहे हे दाखवून दिग्दर्शकाने चांगली शक्कल लढविली आहे. ‘जयदेव’ हे नवे पात्र चित्रपटात आहे. त्यासाठी अतुल कुलकर्णीसारखा अभिनेता घेतल्याने दाद द्यायला हवी.
‘जयदेव’मुळे आजच्या काळाला अनुसरून एक धाडसी पत्रकार तेलमाफिया ‘तेजा’ला त्याच्या तोंडावर उद्या तुझ्या काय काय कुलंगडय़ा छापणार त्याची कल्पना देतो हे मात्र पटणारे नाही. परंतु, ‘जयदेव’ या पात्राची कथानकातील मांडणी चांगली जमली आहे. त्याच्या मृत्युमुळे विजय खन्नाचा संघर्ष अधिक तीव्र होतो, त्यांच्या संघर्षांला धार येते हे लेखकाने चांगल्या प्रकारे प्रस्थापित केले आहे. मेहरांच्याच पुढच्या पिढीने हा रिमेकपट केला असला तरी दाक्षिणात्य भडक मारधाडपटांप्रमाणेच तो वाटतो. प्रेक्षकाच्या मनाचा ठाव घेण्यात अर्धवटच यशस्वी ठरतो.

जंजीर
निर्माते – सुमीत प्रकाश मेहरा, पुनित प्रकाश मेहरा
दिग्दर्शक – अपूर्व लाखिया
पटकथा – सुरेश नायर, अपूर्व लाखिया
छायालेखक  – गुरूराज जॉईस
संगीत – मीट ब्रॉस अंजान, आनंद राज आनंद
कलावंत – राम चरण, प्रियांका चोप्रा, संजय दत्त, प्रकाश राज, माही गिल, अतुल कुलकर्णी व अन्य.
सुनील नांदगावकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 9:54 am

Web Title: zanjeer2013 film masala entertainment but
टॅग Bollywood
Next Stories
1 छोटी फिल्म, बडी बात
2 ‘शुद्ध देसी रोमान्स’
3 फिल्मी सत्याग्रह
Just Now!
X