ठाणे महापालिकेने मोठा गाजावाजा करत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते घरांच्या चाव्यांचे वाटप केलेल्या कोपरीतील एसआरए योजनेतील एका इमारतीची लिफ्ट गुरुवारी सायंकाळी तेराव्या मजल्यावरून खाली कोसळली. या अपघातात इमारतीचा लिफ्टमन संतोष गावडे जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या महिनाभरापासून लिफ्ट बंद पडणे, मध्येच अडकणे असे प्रकार होत असतानाही तिच्या दुरुस्तीकडे संबंधित शासकीय विभाग आणि बिल्डरचे दुर्लक्ष होत होते, असा आरोप रहिवाशांकडून होत आहे. विशेष म्हणजे, गुरुवारच्या लिफ्ट अपघातानंतर रहिवासी धास्तावल्याचे दिसून आले. तसेच एसआरए इमारतीमधील लिफ्ट घोटाळ्याचे चित्र समोर आले आहे.
कोपरी येथील धोबीघाट परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत श्री श्रमसाफल्य या १३ मजली दोन इमारती उभारण्यात आल्या असून या इमारतीच्या एका मजल्यावर आठ सदनिका बांधण्यात आल्या आहेत. या इमारतींमध्ये सुमारे १९२ कुटुंबांसाठी सदनिकांची निर्मिती करण्यात आली आहे. दहा ते बारा वर्षांपूर्वी या प्रकल्पास सुरुवात झाली. २०१३ मध्ये प्रत्यक्षात या इमारतीच्या उभारणीचे काम पूर्ण झाले. महिनाभरापूर्वी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते या इमारतीमधील रहिवाशांना घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. असे असले तरी, या इमारतीत अजून सर्वच रहिवासी राहायला आलेले नाहीत.
श्री श्रम साफल्य ए-२ या इमारतीमध्ये दोन लिफ्ट बसविण्यात आल्या असून या दोन्ही लिफ्टमध्ये गेल्या महिनाभरापासून वारंवार बिघाड होत आहे. १५ दिवसांपूर्वी एक लिफ्ट इमारतीच्या आठव्या मजल्यावर बंद पडली होती. त्या वेळी लिफ्टमध्ये चार वयोवृद्ध नागरिक आणि एक महिला अडकली होती. लिफ्ट पूर्णपणे बंद असल्यामुळे रहिवाशांनी दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढले होते. त्या वेळी या घटनेमुळे घाबरलेली ती महिला बेशुद्ध पडली होती. तेव्हापासून ही लिफ्ट बंद अवस्थेतच आहे. त्याचप्रमाणे दुसरी लिफ्टही वारंवार बंद पडणे, पाचव्या आणि आठव्या मजल्यावर अडकणे असे प्रकार सुरू होते. लिफ्ट वर-खाली जाताना कंपन (व्हायब्रेट) व्हायची. गुरुवारी लिफ्ट मध्येच अडकत असल्यामुळे लिफ्टमन संतोष १३ व्या मजल्यावर लिफ्ट घेऊन गेला आणि तपासणी करत होता. त्या वेळी लिफ्ट खाली कोसळली. हा अपघात इतका भयानक होता की, लिफ्ट तळमजल्यावर आपटून तिसऱ्या मजल्यापर्यंत उडून खाली आली, अशी माहिती रहिवाशांनी दिली.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारतींच्या बांधकामाविषयीचे घोटाळे आतापर्यंत समोर आले आहेत. आता या अपघातामुळे इमारतीच्या लिफ्टचा घोटाळा समोर आला आहे. रहिवासी अजून या इमारतीत राहण्यास आलेले नसतानाही इमारतीच्या लिफ्टमध्ये बिघाड होऊ लागला आणि ती वारंवार बंद पडू लागली आहे. त्यामुळे इमारतीच्या लिफ्ट आणि तिच्या कामाविषयी आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दरम्यान, या घटनेची तसेच लिफ्टच्या तपासणीचा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात येणार आहे. त्याआधारे ते लिफ्ट कोसळण्यासंबंधीचे निष्कर्ष काढतील. त्यानंतर लिफ्ट कोसळण्याचे कारण स्पष्ट होईल, असे चेंबूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.