मागासक्षेत्र विकास (बीआरजीएफ) निधी वितरण व खर्चात जिल्ह्य़ात मोठी तफावत असल्याचा आरोप खासदार सुभाष वानखेडे यांनी केला. पाणीयोजनेच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल न झाल्यास केंद्रीय समितीमार्फत चौकशी करून कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जि. प. अध्यक्ष मीनाक्षी बोंढारे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल, समिती सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वानखेडे यांनी वरील आरोप केला. सत्ताधाऱ्यांचे दोष दाखवायचे काम विरोधक व्यवस्थित पार पाडत आहेत, असे सांगून वानखेडे यांनी सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर दिला. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना ही संधीच मिळणार नाही असे काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजनेच्या कामात मोठे गैरप्रकार झाले. यात सहभागी असलेल्यांवर प्रशासन गुन्हे दाखल करणार नसेल तर यापुढे केंद्रीय समितीद्वारे चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात येईल, असेही वानखेडे यांनी स्पष्ट केले.