उंब्रज (ता. कराड) येथील महामार्गालगतच्या बसस्थानकाशेजारील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला आज दुपारी बाराच्या सुमारास आग लागली. या आगीत शाळेतील जुन्या कागदपत्रांसह पाठय़पुस्तके, खेळाचे व शैक्षणिक साहित्य जळून मोठे नुकसान झाले.
या घटनेची उंब्रज पोलिसात नोंद झाली असून, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी आणि यात सुमारे १० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सुदैवाने शाळेस सुटी असल्याने जीवितहानीचा अनर्थ टळला. या आगीचे वृत्त समजताच उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अरूण देवकर व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलीस व स्थानिक ग्रामस्थांसह तरूणांनी मोठय़ा शिताफीने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुमारे दोन तास आगडोंब उसळलेला होता. त्यात शासकीय दस्तावेज, जुने रेकॉर्ड, ७०० पाठय़पुस्तके, इतर शैक्षणिक साहित्य, वर्गाचे दरवाजे, खिडक्या, जळल्याचे तसेच भिंतींना तडे जाऊन छताचा पत्रा व आडे जळून खाक झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.