वीज कोसळून एकाचा बळी

सोलापूर जिल्हय़ात एकीकडे दुष्काळाची तीव्रता वाढत असताना दुसरीकडे उष्णतेची धग वरचेवर वाढतच चालली आहे. दरम्यान, काल बुधवारी रात्री नऊच्या सुमारास माढा तालुक्यातील लोंढेवाडी येथे बेमोसमी पाऊस पडत असताना अचानकपणे अंगावर वीज कोसळल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

सोलापूर जिल्हय़ात एकीकडे दुष्काळाची तीव्रता वाढत असताना दुसरीकडे उष्णतेची धग वरचेवर वाढतच चालली आहे. दरम्यान, काल बुधवारी रात्री नऊच्या सुमारास माढा तालुक्यातील लोंढेवाडी येथे बेमोसमी पाऊस पडत असताना अचानकपणे अंगावर वीज कोसळल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मागील आठवडय़ाच्या कालावधीत बेमोसमी पाऊस, वादळी वारे व वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये तब्बल दहाजणांचा बळी गेला आहे.
काल माढा तालुक्यातील लोंढेवाडी येथे वीज अंगावर कोसळून संतोष राजाराम लोंढे (वय ३५) हा जागीच मृत्युमुखी पडला. लोंढे हा आपल्या शेतातील वस्तीवरून विहिरीकडे जात असताना अचानकपणे त्याच्या अंगावर वीज कोसळली. माढा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
काल बुधवारी सोलापुरात तापमानाचा पारा ४२.४ अंश सेल्सियसपर्यंत वाढला होता. रात्री अचानकपणे बेमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्ते जलमय झाले होते. वाहतुकीवरही परिणाम झाला. रात्री काही वेळानंतर थांबलेला पाऊस गुरुवारी पहाटे पुन्हा सुरू झाला. त्यामुळे अनेकांची झोप उडाली. गुरुवारी तापमानात अंशत: घट होऊन ४२ अंश सेल्सियस एवढे तापमान मोडले गेले. वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाही लाही होत असून हा उन्हाळा कधी संपतो, असे वाटू लागले आहे. ग्रामीण भागात वाढत्या उष्म्यामुळे दुष्काळी स्थिती भीषण स्वरूप धारण करीत असताना इकडे शहरात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणीबचतीच्या नावाखाली पालिकेने मागील महिन्यापासून एक दिवसाआडऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण अमलात आणले खरे, परंतु दोन दिवसाआड पाणीपुरवठासुद्धा सुरळीतपणे होत नसून त्यात वारंवार विस्कळीतपणा येत आहे. आज गुरुवारी शहराच्या पश्चिम भागात विशेषत: गावठाण भागात चौथ्या दिवशी नागरिक चातकाप्रमाणे पाण्याची प्रतीक्षा करीत होते. सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा होत नव्हता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 1 died by lightening mishap

ताज्या बातम्या