मनपा प्रशासनाने येथील राठी पेठेवाला या व्यापारी प्रतिष्ठानमधील अस्वच्छता व प्लास्टिक पिशव्यांचा अर्निबध वापरामुळे या प्रतिष्ठानला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मनपाच्या आरोग्य विभागाने ही कारवाई केली.
महापालिकेच्या प्रशासनाने शहर सुंदर व स्वच्छ करण्याचा सपाटा लावला असून त्या अंतर्गत मानवी जीवनाला घातक अशा प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर र्निबध घालण्यात आले व तशा सूचना शहरातील विविध व्यावसायिकांना देण्यात आल्यात, तरीही अनेक व्यापारी नियम पाळत नाहीत, असे दिसून आले. मनपाच्या या धडक कारवाईस काही व्यापाऱ्यांचा विनाकारण विरोध होत आहे, तर काहींनी अगदी राष्ट्रीय कार्य समजून स्वत: प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. प्रशासनाने नागरिकांनाही प्लास्टिक वापर करू नये, याबाबत सूचना केल्या आहेत, पण नागरिकही प्लास्टिकचा वापर करीत असल्याचे दिसते. राठी पेठेवाल्याचे दुकानही मनपाच्या आरोग्य विभागाने सील केले आहे. दरम्यान, मनपाच्या आरोग्य विभागाने चौधरी हॉस्पिटलसमोरील मधू हॉटेलवरही कारवाई करून त्याचे अतिक्रमण काढून टाकले. या घटनेने संतापलेल्या हॉटेलचालकांनी हॉटेलमधील पदार्थ रस्त्यावर फे कले व मनपा विभागास बदनाम करण्याचे प्रयत्न केले, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. मनपाच्या आरोग्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण पाडतांना हॉटेलमधील पदार्थ रस्त्यावर फेकल्याचा आरोप मधू रायपुरे यांनी केला, पण आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत विचारल्यावर ते म्हणाले, आम्ही कोणताही पदार्थ रस्त्यावर फेकलेला नाही. उलट, आम्ही असे विषाक्त व शिळे पदार्थ आढळले तर ते जप्त करून परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवितो.