थकीत मालमत्ता कराला लावलेल्या दंडात ५० टक्के सवलत देण्याला मिळालेला भरघोस प्रतिसाद लक्षात घेऊन आता या दंडमाफीला येत्या ३० एप्रिल अखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महापौर शीला शिंदे, स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे, नगरसेवक संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, शिवाजी लोंढे, गणेश कवडे, सोनाबाई शिंदे आदींनी आयुक्तांना याबाबतचे पत्र दिले होते. या सर्वाबरोबर चर्चा करून दंडमाफीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आयुक्त विजय कुलकर्णी यांनी सांगितले. थकीत कर जमा करत असताना चालू वर्षांचा कर भरणे ही काही मालमत्ताधारकासाठी फार अवघड बाब नसेल असे ते म्हणाले.
मात्र ही सवलत देताना संबधिताला या वर्षांचाही मालमत्ता कर जमा करावा लागणार आहे. त्यात त्याला नियमाप्रमाणे पुन्हा १० टक्के सवलत मिळेल. त्यामुळे मनपाकडे त्याचा थकलेला कर तर जमा होणारच आहे, शिवाय चालू वर्षीचा करही पहिल्याच महिन्यात जमा होईल. मनपाच्या तिजोरीत त्यामुळे वर्षांच्या सुरुवातीलाच मोठया रकमेची भर पडणार आहे. त्याच हेतूने महापौरांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या म्हणण्याला मान देत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
मालमत्ता कराची मार्च अखेर जमा झालेली रक्कम ३८ कोटी ६४ लाख ७८ हजार ९२३ इतकी आहे. रात्री उशिरापर्यंत मनपाने वसुली विभागाची सर्व कार्यालये सुरू ठेवली होती. तीनच महिन्यांपुर्वी मनपाकडे मालमत्ता कराचे म्हणून फक्त २३ कोटी रूपये जमा झाले होते. त्यामुळे मनपाचा सगळा आर्थिक डोलारा कोसळण्याच्या बेतात होता. मात्र जानेवारीत आयुक्त कुलकर्णी यांनी दंडात ५० टक्के सवलत जाहीर केली व त्यातून भरणा वाढू लागला.
तरीही मागील वर्षीपेक्षा यावेळची रक्कम कमीच आहे. त्याला कारण मध्यंतरी सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी १०० टक्के दंडमाफीचा ठराव मंजूर करून घेतला. आयुक्तांनी त्याला ठाम विरोध केला तरीही तो डावलून हा ठराव बहुमताने मंजूर केला गेला. त्यानंतर आयुक्तांनी त्याची अंमलबजावणी करण्याचेच नाकारले. या वादात सलग ५ दिवस भरणा जवळपास थांबलाच होता. तरीही बऱ्यापैकी बेगमी झाल्याने काही महिन्यांपूर्वी हिरमुसलेले प्रशासन आता थोडे तरी आनंदले आहे.