अंबरनाथच्या इनरव्हील शाळेचे यश
रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रतापसिंग मोरारजी मेमोरियल ट्रस्ट संचालित अंबरनाथ येथील कायम विनाअनुदानित तत्त्वावरील इंग्रजी माध्यमाच्या इनरव्हील शाळेने गेली बारा वर्षे सातत्याने दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के यश मिळविले आहे.
यंदा शाळेतून १६१ विद्यार्थी दहावीला बसले होते. त्यापैकी पाच विद्यार्थ्यांनी ९६ टक्क्य़ांहून अधिक, ३२ विद्यार्थ्यांनी ९० ते ९५ टक्के, ६८ विद्यार्थ्यांनी ७५ ते ८९ टक्के, ४७ विद्यार्थ्यांनी ६० ते ७४ टक्के, तर नऊ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली. अविनाश अच्छरा (९६.५५ %) प्रथम, अनिका लाल आणि मनीषा कर्मचंदनानी (९६.१८ %), द्वितीय, तर रुचिला देशपांडे आणि कुंदन पाटील यांनी ९६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. रविवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
अत्याधुनिक शिक्षण प्रणालीचा कायम अवलंब करणाऱ्या या शाळेने ७५ लाख रुपये खर्चून पहिली ते दहावीच्या सर्व १८ वर्गामध्ये अभ्यासक्रमाचा सर्व तपशील नोंद असणारे डिजिटल फळे बसविले आहेत. तसेच एकूण पटसंख्येपैकी आर्थिक दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या शासकीय धोरणाची अंमलबजावणीही शाळेने केली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष संजय पानसे यांनी दिली.  या शाळेत प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी हजारो पालकांची झुंबड उडते. मात्र जागेच्या मर्यादेमुळे सर्वाना प्रवेश देता येत नाही. योगायोगाने शाळेच्या इमारतीलगतच सूर्योदय गृहनिर्माण सोसायटीचा दीड हजार चौरस मीटरचा भूखंड मोकळा असून तो शैक्षणिक कारणांसाठीच राखीव आहे. शाळा व्यवस्थापनाने सोसायटीकडे रितसर पत्रव्यवहार करून हा भूखंड शाळा विस्तारीकरणासाठी मागितला आहे.